दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 05:11 PM2024-05-07T17:11:12+5:302024-05-07T17:11:56+5:30
दीपिका सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे. दोघंही सध्या बेबीमूनवर गेल्याची चर्चा होती.
बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) लवकरच बाबा होणार आहे. अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) सप्टेंबरमध्ये त्यांच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. नुकतंच हे कपल बेबीमून एन्जॉय करण्यासाठी व्हॅकेशनवर गेले आहेत. पण दुसरीकडे रणवीर सिंहच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर वेगळ्याच हालचाली झाल्या आहेत. रणवीरच्या इन्स्टाग्रामवर फक्त १३३ पोस्ट दिसत असून 2023 च्या आधीचे सर्व फोटो गायब झाले आहेत. नक्की घडलं काय?
दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंह यांनी 2018 मध्ये इटलीतील लेक कोमो येथे लग्नगाठ बांधली. त्यापूर्वी काही वर्षांपासूनच दोघंही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. रामलीला सिनेमावेळी त्यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. आता ते आईबाबा होणार आहेत. रणवीर सिंहची फॅन फॉलोइंग मोठी आहे. त्याच्या इन्स्टाग्रामवर हजारो पोस्ट आतापर्यंत दिसत होत्या. त्यात ब्रँड्स, आणि इतर फोटो तर आहेतच पण त्याचे लग्नाचे फोटोही होते. आता अचानक रणवीरच्या इन्स्टाग्रामवर केवळ एकूण 133 पोस्ट दिसत आहे. 2023 पूर्वीच्या सर्व पोस्ट त्याने हाईड किंवा डिलीट केल्या आहेत. यामागचं नक्की काय कारण असेल असाच प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे. रणवीरने पोस्ट हाईट केल्या आहेत का की त्याचं अकाऊंट हॅक झालं आहे असेही प्रश्न चाहत्यांना पडलेत.
रणवीर आणि दीपिका दोघांनी सध्या कामातून ब्रेकही घेतला आहे. दीपिका आई होणार असल्याने रणवीरनेही तिच्यासोबत वेळ घालवायचं ठरवलं आहे. दोघांनी 'सिंघम अगेन'चं शूट केलं असून आता ते व्हॅकेशनवर गेले आहेत. रणवीरसमोर 'डॉन 3','सिंघम अगेन' सारखे महत्वाचे प्रोजेक्ट आहेत. मात्र त्यानेही दीपिकासाठी आणि होणाऱ्या बाळासाठी कामातून ब्रेक घेतला आहे. पण अचानक इन्स्टाग्रामवरील या बदलांनी चाहत्यांना संभ्रमात पाडलं आहे. याआधी रणवीर आणि दीपिका वेगळे होणार अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. तोच दीपिकाने गुडन्यूज देत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला. आता त्यांच्यात सर्वकाही आलबेल असो अशी आशा चाहत्यांनी व्यक्त केली आहे.