Ranveer Singh : यात चुकीचं काय? रणवीरविरोधात FIR दाखल करणाऱ्यांवर भडकले ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 10:36 AM2022-07-27T10:36:55+5:302022-07-27T10:42:09+5:30
Ranveer Singh Nude Photoshoot : स्वरा भास्करही संतापली... स्वरानं रणवीरच्या फोटोशूटवर आणि त्यावर सुरु असलेल्या ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिली आहे.
Ranveer Singh Nude Photoshoot : रणवीर सिंग (Ranveer Singh) सध्या हेडलाईन्समध्ये आहे. याचं कारण आहे त्याचं न्यूड फोटोशूट. त्याच्या न्यूड फोटोशूटचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत आणि ‘हंगामा’ सुरू झाला. सध्या रणवीरच्या न्यूड फोटोशूटवरून वातावरण तापलं आहे. रणवीरविरोधात मुंबई पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली आहे. रणवीरवर जबरदस्त टीका होतेय. अशात आता ‘द काश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri ) आणि अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhasker) रणवीरच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. विवेक अग्निहोत्री व स्वरा भास्कर दोघांनीही रणवीरच्या न्यूड फोटोशूटमध्ये गैर काय? असा सवाल केला आहे.
यात चुकीचं काय?
विवेक अग्निहोत्री यांनी ‘आजतक’ला दिलेल्या मुलाखती यावर प्रतिक्रिया दिली. रणवीर सिंगविरोधातील एफआयआर मूर्खपणा आहे. हे एक असं प्रकरण आहे, ज्याच्याकडे विनाकारण लक्ष वेधलं जात आहे. एफआयआरमध्ये म्हटलं आहे की, रणवीरने महिलांच्या भावना दुखावल्या. आता मला सांगा, महिलांचे इतके सारे न्यूड फोटो समोर येतात, तेव्हा पुरूषांच्या भावना दुखावतात का? असा तर्क म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे. आपल्या संस्कृतीत शरीरसौंदर्यांचं कायम कौतुक केलं गेलं आहे. माझ्या मते, मनुष्यप्राणी हा परमेश्वराची सुंदर रचना आहे. यात चुकीचं काय आहे. रणवीरच्या फोटोशूटला होणारा विरोध रूढीवादी विचाराचं दर्शन घडवते आणि मी याचं समर्थन करत नाही. मला अशा गोष्टी आवडत नाहीत, अशी रोखठोक प्रतिक्रिया विवेक अग्निहोत्रींनी दिली.
स्वरा म्हणाली...
Unbelievable foolishness and unemployment is rampant in our country! https://t.co/HUfOu74hM6
— Swara Bhasker (@ReallySwara) July 26, 2022
अभिनेत्री स्वरा भास्कर हिनेही रणवीरला पाठींबा दिला आहे. ‘आपल्या देशात अविश्वसनीय मूर्खपणा आणि बेरोजगारी पसरली आहे, ’अशा आशयाचं ट्विट तिने केलं आहे.
तर रणवीरला होऊ शकते 7 वर्षांची शिक्षा...!
न्यूड फोटोशूटमुळे रणवीरच्या अडचणी वाढल्या आहेत. मुंबई पोलिसांत त्याच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्याच्याविरोधात अनेक कलमाअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या कलमाअंतर्गत 7 वर्ष कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे.