रणवीर सिंगने अशाप्रकारे दिल्या अमृता खानविलकरला वाढदिवसाच्या शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2018 06:30 AM2018-11-25T06:30:00+5:302018-11-25T06:30:02+5:30
रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा म्हणजेच अमृता खानविलकरचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांनी नुकतेच इटली मध्ये जाऊन लग्न केले. इटलीवरून परतल्यावर त्यांनी बंगलुरूला रिसेप्शन दिले आणि त्यानंतर दोन रिसेप्शनस मुंबईत होणार आहेत. मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूडमधील अनेक मंडळी उपस्थित राहाणार आहेत. रणवीर सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यात व्यग्र असला तरी त्याने त्याच्या एका लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस लक्षात ठेवून तिला सोशल मीडियाद्वारे वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
ही मैत्रीण म्हणजे प्रेक्षकांची लाडकी अमृता खानविलकर...रणवीर सिंग हा स्टार असला तरी तो त्याचे स्टारडम कधी गाजवत नाही. त्यामुळेच त्याच्या मनमोकळ्या स्वभावावर अनेकजण फिदा आहेत. मराठीतील स्टार अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील त्याला अपवाद नाही. अमृता रणवीरची खूप चांगली मैत्रीण आहे. अमृताने आतापर्यंत केलेले सिनेमे असो, वा डान्स परफॉर्मन्स असो, रणवीरची सकारात्मक प्रतिक्रिया तिला नेहमीच मिळते. त्यामुळे आपल्या लाडक्या मैत्रिणीचा वाढदिवस विसरेल तर रणवीर कसला? काही दिवसांपूर्वीच संपन्न झालेल्या त्याच्या शाही विवाहसोहळ्यात व्यग्र असूनही, त्याने अमृताचा वाढदिवस विस्मृतीत जाऊन दिला नाही.
अमृताला भेटणं जरी शक्य नसलं तरी, त्याने इन्स्टाग्रामद्वारे तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याने अमृताला 'हॅलो गॉर्जिअस !!!, हॅप्पी बर्थ डे !!!.' असा इन्स्टावर संदेश दिला असून, 'तू एक खास व्यक्ती आहेस, या संपूर्ण जगाचे अमाप प्रेम आणि भरपूर आशीर्वाद तुला मिळो. तसेच हे वर्ष तुझ्यासाठी सर्वोत्तम ठरो. माझ्याकडून तुला खूप खूप प्रेम' अशा शुभेच्छा दिल्या आहेत. अमृतानेही त्याला त्याच्या वैवाहिक आयुष्यासाठी भरपूर शुभेच्छा देत त्याचे आभार मानले.
अमृता खानविलकरचा काल म्हणजेच २३ नोव्हेंबरला वाढदिवस झाला. आज मालिका, डान्स रिअॅलिटी शोसह हिंदी आणि मराठी सिनेमात अमृताने मेहनतीच्या जोरावर तिचे एक अढळ स्थान निर्माण केले आहे. 'गोलमाल', 'साडेमाडे तीन', 'नटरंग', कट्यार काळजात घुसली 'झकास', 'धुसर', 'फक्त लढ म्हणा', 'सतरंगी रे', 'बाजी' अशा मराठी सिनेमात तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत.