83 Movie चे नवे पोस्टर तुम्ही पाहिले का? सगळीकडे आहे या पोस्टरचीच चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 06:43 PM2020-01-11T18:43:50+5:302020-01-11T18:44:48+5:30
रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर हे पोस्टर पोस्ट केले असून याच पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
बॉलिवूडचा बाजीराव म्हणजे रणवीर सिंग लवकरच ८३ चित्रपटात दिसणार आहे. या सिनेमात तो क्रिकेटर कपिल देवची भूमिका साकारणार आहे. सध्या याच चित्रपटाची सगळीकडे चर्चा असून या चित्रपटाचे नवे पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे. हे पोस्टर रणवीर सिंगने त्याच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट केले असून याच पोस्टरची सध्या सगळीकडे चर्चा आहे.
रणवीरने शेअर केलेल्या या पोस्टरमध्ये आपल्याला ताहिर राज भसीन पाहायला मिळत असून तो सुनील गावस्कर यांच्या भूमिकेत दिसणार असल्याचे या पोस्टरसोबत लिहिले आहे. या पोस्टरसोबतच या चित्रपटाचा लोगो देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. या पोस्टरवर नेटिझन्स कमेंटचा वर्षाव करत असून हे पोस्टर खूपच छान आहे तसेच आम्ही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहोत असे नेटिझन्स कमेंटच्या माध्यमातून सांगत आहेत.
'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा असून १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. हा सिनेमा १० एप्रिल २०२०ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रणवीर सिंग चित्रपटात कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. चित्रपटातील रणवीरच्या लुक्सचं सर्वत्र कौतुक होत आहे.
या सिनेमात दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नी रोमी देव यांची भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगचा हा पहिला एकत्रित सिनेमा आहे. या चित्रपटात ताहिर राज भसीन सुनील गावस्करांच्या भूमिकेत, एमी ब्रिक बलविंदर संधूंच्या भूमिकेत, तमीळ अभिनेता जीवा कृष्णामचारी श्रीकांत यांच्या भूमिकेत, चिराग पाटील संदीप पाटील यांच्या भूमिकेत, आदिनाथ कोठारे दिलीप वेंगसरकर यांच्या भूमिकेत, धैर्य करवा रवी शास्त्री यांच्या भूमिकेत आणि साहिल खट्टर सैयद यांच्या भूमिकेत झळकणार आहे.