कर्णबधीर समुदायाला सोबत घेऊन चला...! रणवीर सिंगचे तरूणाईला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 10:38 AM2021-09-24T10:38:25+5:302021-09-24T10:41:49+5:30
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग सातत्याने कर्णबधिर समुदायाच्या समस्यांचा वाचा फोडण्याचं काम करतोय.
बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग सातत्याने मूक कर्णबधिर समुदायाच्या समस्यांचा वाचा फोडण्याचं काम करतोय. भारतीय सांकेतिक भाषेला (आयएसएल) भारताच्या 23 व्या अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, यासाठीही त्याचे प्रयत्न सुरू आहेत. नुकतीच त्याने या मुद्यावर जागरुकता निर्माण करण्यासाठीच्या याचिकेवर स्वाक्षरी केली आहे.
रणवीर सिंगने नवझार इराणीसोबत IncInk हे स्वतंत्र रेकॉर्ड लेबल तयार केले असून यावर सांकेतिक भाषेतील म्युझिक व्हिडिओ रिलीज केले आहेत. भारतीय सांकेतिक भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी रणवीरने चालवलेल्या प्रयत्नानंतर भारतीय कर्णबधिर समुदायाने त्याचे कौतुक केले आहे. त्याचे मन:पूर्वक आभार व्यक्त करणारा व्हिडिओ शेअर केला आहे.
आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनाचे औचित्य साधून रणवीरने कर्णबधिर समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे आवाहन तरूणाईला केले आहे.
‘गेल्या दीड वर्षात कोरोना महामारी काळात आपण जे काही भोगलं, त्यानंतर आपल्यासाठी बहुमूल्य आणि जपण्यासारखी एखादी गोष्ट असेल तर, ती म्हणजे समाजाची शक्ती आणि एकमेकांचा सहवास. आजच्या तरुणाईला माझे एकच सांगणे आहे की, त्यांनी त्यांचे काम करत राहिले पाहिजे आणि ते करताना त्यांनी कर्णबधीर समुदायाला आपल्यात सामावून घेतलं पाहिजे. आपण एकत्रितपणे हा बदल घडवून आणू शकतो, आजच्या काळतल्या तरुणाईवर माझा विश्वास आहे,’असं तो म्हणाला.
पुढे तो म्हणाला, IncInk मध्ये आम्ही कलेचे सृजन करतो. आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिनी रिलीज झालेल्या आयएसएल व्हिडिओत अनेक नव्या संकल्पना आहेत. आम्ही कर्णबधीर समुदायाशी संवादात्मक पध्दतींनी नातेसंबंध वाढवू शकतो, हे सर्व अगदी सुरुवातीच्या टप्प्यात आहे. भारतीय सांकेतिक भाषेला भारतातल्या 23 व्या अधिकृत भाषेचा दर्जा दिला जावा, ही कर्णबधिर समुदायाची मागणी आहे. ही मागणी पुढे रेटणे आपले कर्तव्य आहे. मला आपल्या देशातील नेत्यांवर पूर्ण विश्वास आहे आणि ही मागणी मान्य होईल, अशी आशा आहे. मी नागरिकांना सुद्धा संबंधित याचिकेवर स्वाक्षरी करण्याची विनंती करतो, असेही रणवीर म्हणाला.