रणवीर सिंग '८३' सिनेमासाठी ह्या व्यक्तीकडून घेणार क्रिकेटचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 04:33 PM2018-08-14T16:33:46+5:302018-08-14T16:34:35+5:30
रणवीर सिंग '८३' चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका साकारणार आहे.
रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाच्या तारीख निश्चित झाल्याचे वृत्त आल्यानंतर आता रणवीर सिंगचा आगामी चित्रपट '८३'ची नवीन माहिती समोर आली आहे. या सिनेमासाठी रणवीरला भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार कपिल देव क्रिकेटचे प्रशिक्षण देणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.
रणवीर सिंग '८३' या १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या वर्ल्ड कपवर आधारित चित्रपटामध्ये कपिल देवची भूमिका साकारताना दिसणार आहे. त्यामुळे कपिल देवची भूमिका साकारण्यासाठी त्याला आता कपिलकडूनच धडे मिळणार आहेत. यावर्षाच्या शेवटी या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार असल्याचे दिग्दर्शक कबीर बेदीने सांगितले आहे. इतकेच नाही तर क्रिकेटमधील प्रत्येक बारकाव्याचे नीट निरीक्षण रणवीर कपिल देव यांच्याकडून शिकणार असून कपिल देव मुंबईमध्ये खास यासाठी येणार आहेत.
कबीर खान १९८३ च्या वर्ल्डकपवर चित्रपट बनवत असून यामध्ये कपिल देवची भूमिका रणवीर सिंग साकारत आहे. '८३' या चित्रपटाची तयारी सध्या जोरदार चालू असून हा चित्रपट १० एप्रिल, २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. रणवीरने याविषयी याआधी या चित्रपटात काम करणे हा आपला सम्मान असल्याचे सांगितले आहे.
रणवीर सिंगने फारच कमी कालावधीमध्ये चित्रपटांमध्ये अभिनयाची जोरदार बॅटिंग केली असून आता '८३' चित्रपटामध्ये काय कमाल दाखवणार हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.