रतन टाटा यांना आवडत नव्हते बॉलिवूड चित्रपट, रक्तपात पाहून व्हायचे अस्वस्थ, सिमी गरेवालला सांगितलं होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 10:26 AM2024-10-10T10:26:33+5:302024-10-10T10:27:38+5:30
Ratan Tata Passed Away: प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा यांनी वयाच्या ८६व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
प्रसिद्ध उद्योगपती आणि समाजसेवक रतन टाटा (Ratan Tata) यांचे ९ ऑक्टोबर रोजी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. रतन टाटा यांच्या योगदानामुळे सर्व स्तरातील लोक त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अभिनेत्री सिमी गरेवाल (Simmi Garewal) यांनी रतन टाटा यांना श्रद्धांजली देत भावनिक पोस्ट लिहिली आहे. अभिनेत्रीसोबतचा त्यांचा एक जुना व्हिडीओदेखील चर्चेत आला आहे.
सिमी गरेवालसोबतच्या मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितले होते की, त्यांना बॉलिवूड चित्रपट फारसे आवडत नाहीत. बॉलिवूड चित्रपटांचे तुम्ही काहीही करू शकत नाही, तुम्ही टीव्हीवर चित्रपट पाहू शकता, असे विनोदी अंदाजात ज्येष्ठ उद्योगपती म्हणाले होते. चित्रपटांमध्ये रक्तपात दाखवले जाते, त्याचा त्यांनी निषेध केला होता.
त्यांना सिनेमातील रक्तपात आवडत नव्हता
ते म्हणाले होते की, 'बॉलिवूडचे चित्रपट खूप क्रूर असतात. हिंदी चित्रपटांमध्ये जेवढे केचअप वापरले जाते तेवढे मुंबईतील रेस्टॉरंटमध्येही वापरले जात नाही असे मला वाटते. टीव्ही पाहताना माझी खूप चिडचिड होते. माझ्यात धीर नाही आणि मी एकाच वेळी ४-५ चॅनेल पाहतो. हिंदी चित्रपटांमध्ये रक्त दाखवण्यासाठी केचअपचा वापर केला जातो.
शासकीय इतमामात दिला जाणार अंतिम निरोप
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. दुसरीकडे, टाटा समूहाने माहिती दिली आहे की, रतन टाटा यांचे पार्थिव दक्षिण मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (NCPA)च्या लॉनमध्ये आज सकाळी १० ते ४ या वेळेत म्हणजेच १० ऑक्टोबर रोजी ठेवण्यात येणार आहे.