'जोपर्यंत मी शेवटची आहे...' नसीरुद्दीन शाह यांच्या अफेअर्सवर रत्ना पाठक स्पष्टच बोलल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 09:18 AM2023-10-17T09:18:11+5:302023-10-17T09:19:22+5:30
एका मुलाखतीत त्यांनी पतीचे जुने अफेअर्स, घटस्फोट यावर संवाद साधला.
ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) आणि त्यांची पत्नी रत्ना पाठक शाह (Ratna Pathak Shah) हे बॉलिवूडमधील पॉवर कपल आहे. विशेष म्हणजे दोघंही बेधडकपणे सामाजिक विषयांवर आपलं मत मांडत असतात. अगदी वैयक्तिक आयुष्याबाबतही खुलेपणाने बोलतात. रत्ना पाठक सध्या 'धक धक' सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. यानिमित्त एका मुलाखतीत त्यांनी पतीचे जुने अफेअर्स, घटस्फोट यावर संवाद साधला. तसंच त्यांच्या सुखी वैवाहिक जीवनाचं रहस्य काय आहे हेही त्यांनी यावेळी सांगितलं.
रत्ना पाठक यांनी Humans of Bombay ला दिलेल्या मुलाखतीत नसीरुद्दीन शाह यांच्याशी पहिली भेट, त्यांचे जुने अफेअर्स या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या,'आम्ही एका नाटकात सोबत काम करत होतो. संभोग से संन्यास तक असं त्या नाटकाचं नाव होतं. तेव्हाच आम्हाला हे जाणवलं की आम्हाला सोबत राहायचं आहे. आम्ही फारच मूर्ख होतो एकमेकांना जास्त प्रश्नच विचारले नाही. आजकाल लोक एकदम योग्य प्रश्न विचारतात. आम्हाला वाटलं हे नातं छान वाटतंय तर प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि हे काम करुन गेलं. हे नातं पूर्ण अस्थायी होतं. यासाठी कोणालाच श्रेय देता येणार नाही कारण हे आपोआपच यशस्वी झालं.'
नसीरुद्दीन शाह यांचा पहिला घटस्फोट, त्यानंतरच्या अफेअर्सवर रत्ना पाठक म्हणाल्या,'मला त्यांच्या भूतकाळाविषयी काहीच देणंघेणं नव्हतं. मी प्रेमात होते. ते बऱ्याच काळापासून आपल्या पत्नीपासून वेगळे राहत होते. नंतर ते अनेक मुलींसोबत रिलेशनशिपमध्येही होते. पण तो भूतकाळ आहे. मग मी त्यांच्या आयुष्यात आले. जोपर्यंत मी शेवटची आहे मी ठीक आहे. मला काहीच अडचण नाही.'
हनिमून अर्धवट सोडून परत आलो
रत्ना पाठक म्हणाल्या,'लग्नानंतर एक आठवड्याने आम्ही हनिमूनला गेलो. पण ते अर्धवट सोडून परत आलो. कारण त्यांना जाने भी दो यारो सिनेमाच्या चित्रीकरणाला जावं लागणार होतं. नंतर कित्येक दिवस मी त्यांना बघितलंच नाही. ते फारच हैराण करणारं होतं. तीस दिवस ते गायब होते मला कळत नव्हतं की ते जीवंत आहे का की गेले की कोणासोबत पळून गेले. तो खरंच माझा वेडेपणा होता.'
नसीरुद्दीन शाह आणि रत्ना पाठक 1982 मध्ये लग्नबंधनात अडकले. त्यांना दोन मुलं झाली. सुरुवातीला रत्ना पाठक यांच्या कुटुंबाचा विरोध होता कारण नसीरुद्दीन हे विवाहित होते. मात्र नंतर ते तयार झाले.