रत्ना पाठकने दिली होती सुप्रिया पाठकला आत्महत्येची धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2023 07:42 AM2023-06-30T07:42:09+5:302023-06-30T07:42:59+5:30
Ratna pathak:बहिणीच्या जीवाचं काही बरंवाईट होईल अशी भीतीने सुप्रिया पाठक यांना होती.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध बहिणींची जोडी म्हणजे रत्ना पाठक (Ratna Pathak) आणि सुप्रिया पाठक (Supriya Pathak). या दोघी बहिणींनी आपल्या उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण केलं. या दोघींचं एकमेकींसोबत उत्तम नातं असून त्या कायम एकमेकींविषयी बोलत असतात. यात अलिकडेच या दोघा बहिणींनी एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये रत्ना पाठक कायम सुप्रिया यांना आत्महत्येची धमकी द्यायच्या असं सांगितलं.
अलिकडेच या दोघींनी ट्विंकल खन्नाच्या 'ट्विक इंडिया'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये दोघींनीही त्यांच्या बालपणापासून ते फिल्मी करिअरपर्यंत अनेक गोष्टींवर भाष्य केलं. यात ट्विंकलने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देत असताना त्यांनी रत्ना पाठक कशाप्रकारे सुप्रिया यांना धमकी द्यायच्या ते त्यांनी सांगितलं.
तुम्ही कधी सुप्रिया यांना कोणती धमकी दिली आहे का? असा प्रश्न ट्विंकलने रत्ना पाठक यांना विचारला. त्यावर, हो तर. मोठी बहीण असतेच कशासाठी? आणि, छोटी बहीण तरी कशासाठी असते? त्यांना धमकावलंच पाहिजे, असं रत्ना पाठक म्हणाल्या. त्यांचीच री ओढत सुप्रिया पाठक यांनीही रत्ना कशाप्रकारे धमकवायची हे सांगितलं.
"तिने मला कधी मारलं नाही. पण तिने मला खूप धमकावलं. आमच्या घराला एक खिडकी होती आणि तिथेच आई-वडिलांची खोली. या खिडकीमध्ये एसी बसवला होता. याच खिडकीच्या एका बाजूला जाऊन ती पाय अडकवायची आणि मला धमकी द्यायची. की, तू हे केलं नाहीस तर मी उडी मारेन. तिला माहित होतं ती खरोखर पडणार नाहीये", असं सुप्रिया म्हणाल्या.
पुढे त्या म्हणतात, "तिला माहिती होतं की एसीच्या डक्टमुळे ती पडणार नाही. पण, मला त्याची कल्पना नव्हती. त्यामुळे मी ती सांगेन तसं करायचे." दरम्यान, रत्ना आणि सुप्रिया या दोघी अभिनेत्री दिना पाठक यांच्या लेकी. दिना पाठकदेखील प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. रत्ना पाठक यांनी नसिरुद्दीन शाहसोबत लग्न केलं. तर, सुप्रिया पाठक यांनी पंकज कपूरसोबत संसार थाटला. अलिकडेच रत्ना यांची हॅप्पी फॅमिली कंडिशन्स अप्लाय या वेबसीरिजमध्ये झळकल्या होत्या. तर, सुप्रिया पाठक लवकरच सत्यप्रेम की कथा या सिनेमात दिसणार आहेत.