या प्रसिद्ध अभिनेत्याच्या प्रेमात आकंठ बुडाल्याने रवीनाने केला होता आत्महत्येचा प्रयत्न?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 09:57 AM2019-10-26T09:57:28+5:302019-10-26T10:03:18+5:30
रवीनाच्या व्यवसायिक आयुष्याइतके तिचे वैयक्तिक आयुष्यदेखील नेहमीच चर्चेत राहिले.
रवीना टंडनचा आज म्हणजेच 26 ऑक्टोबरला वाढदिवस असून रवीनाने वयाची चाळीशी ओलांडली असली तरी आजही ती तितकीच फिट आहे. तिच्या सौंदर्यावर आजही तिचे फॅन्स फिदा आहेत. मोहरा, लाडला, दिलवाले, अंदाज अपना अपना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिने खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मोहरा हा तर तिचा चित्रपट सुपरहिट ठरला. यातील ‘तू चीज बडी है मस्त मस्त...; हे गाणे प्रचंड लोकप्रिय झाले. याच गाण्यामुळे बॉलिवूडची ‘मस्त मस्त गर्ल’ म्हणून रवीना ओळखली जाऊ लागली.
रवीनाच्या वडिलांचे नाव रवि टंडन तर आईचे नाव वीणा टंडन. याच दोघांची नावे मिळून रवीनाचे नाव ठेवण्यात आले. रवीनाचे वडील एक नामवंत चित्रपट निर्माते होते. रवीना कॉलेजमध्ये असताना तिची ओळख दिग्दर्शक शांतनु शोरी यांच्याशी झाली. शांतनु यांनी रवीनाला बॉलिवूडमध्ये येण्याचा सल्ला दिला आणि याचमुळे कॉलेज सोडून रवीनाने बॉलिवूडची वाट धरली. ‘पत्थर के फूल’ या चित्रपटाद्वारे रवीनाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यात सलमान खान तिचा हिरो होता. हा चित्रपट दणकून आपटला. पण यातील रवीनाच्या अभिनयाचे चांगलेच कौतुक झाले.
रवीनाने 2004 मध्ये अनिल थडानीसोबत लग्न केले. पण रवीनाचे अक्षय कुमार, अजय देवगण यांच्यासोबतचे प्रेमप्रकरण चांगलेच गाजले होते. अजय आणि रवीना यांचे अनेक वर्षं अफेअर होते. अजय आणि रवीनाने गैर, दिलवाले, एक ही रास्ता, जंग यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांच्यात अनेक वर्षं प्रेमप्रकरण सुरू होते. पण अजयच्या आयुष्यात करिश्मा कपूर आल्यानंतर त्याने रवीनासोबत ब्रेकअप केले असे म्हटले जाते. अजयवर रवीना प्रचंड प्रेम करत होती. त्यामुळे अजय तिच्यापासून दूर गेलेला ती सहनच करू शकली नव्हती आणि तिने डिप्रेशन मध्ये जाऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला असल्याचे नव्वदीच्या दशकात अनेक वर्तमानपत्रात आले होते.
ब्रेकअपनंतर अजय आणि रवीना हे एकमेकांचे अक्षरशः शत्रू बनले होते. रवीनाने अनेक मुलाखतींमध्ये अजय विरोधात आपले मत मांडले होते. अजयने तिला फसवले असल्याचे तिने म्हटले होते. त्यावर रवीनाला मानसोपचारतज्ज्ञाची गरज असल्याचे अजयने फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत रवीनाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नाबाबत देखील अजय बोलला होता. त्याने सांगितले होते की, रवीनाला मी प्रेम पत्र लिहिले असल्याचे तिने म्हटले आहे. असे कोणतेच पत्र मी लिहिलेले नाहीत. तिला वाटत असेल तर तिने ही पत्रं खुशाल छापावीत. माझे नाव घेऊन ती पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने आत्महत्येचा जो प्रयत्न केला, तोदेखील एक पब्लिसिटी स्टंटच होता.