“काजोल व मी...”, रवीनाने ‘कुछ कुछ होता है’ का नाकारला? तब्बल २५ वर्षानंतर केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 04:25 PM2023-02-08T16:25:17+5:302023-02-08T16:27:16+5:30
Raveena Tandon : रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा.
९० चं दशक गाजवणारी बॉलिवूडची मस्त मस्त गर्ल रवीना टंडन (Raveena Tandon) आजही इंडस्ट्रीत सक्रीय आहे. रवीनाने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिलेत. काही सुपरहिट सिनेमे नाकारले सुद्धा. ‘कुछ कुछ होता है’ ( Kuch Kuch Hota Hai) हा असाच रवीनाने नाकारलेला एक सिनेमा. होय, ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट रवीनाला ऑफर झाला होता. मात्र तिने करण जोहरचा हा सिनेमा धुडकावून लावला. इतक्या वर्षानंतर आत्ता कुठे रवीनाने याबद्दलचा खुलासा केला आहे. हा सिनेमा नाकारण्यामागचं कारणही तिने सांगितलं आहे.
शाहरुख खान, काजोल, राणी मुखर्जी यांची मुख्य भूमिका असलेला ‘कुछ कुछ होता है’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला होता. १९९८ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर छप्परफाड कमाई केली होती. पण हा सिनेमा कदाचित रवीनाच्या नशीबात नसावा. तिने या चित्रपटाला नकार कळवला होता. आता या नकाराचं कारण काय, तर काजोल.
नुकतंच रवीना टंडनने याबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “मला कुछ कुछ होता है ऑफर झाला होता. पण मी यासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. करणने मला या सिनेमासाठी विचारलं होतं. मी त्याला नकार कळवला. याचं एकच कारण होतं, ते म्हणजे, माझं सिनेमातील पात्र काजोलच्या तुलनेत फारच कमकुवत होतं. ते फारच कमी वेळ पडद्यावर दिसणार होतं. ही इतकी छोटी भूमिका करण्याची माझी तयारी नव्हती. मी आणि काजोलने एकत्र सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आम्ही एकाच वयाच्या आहोत. माझं करिअर चांगलं सुरु होतं. अशात काजोलच्या तुलनेत कमी महत्त्वाची भूमिका मला नको होती. मला लहान भूमिका करण्यात काहीही इंटरेस्ट नव्हता. यामुळेच मी या चित्रपटात काम करण्यास नकार दिला. कदाचित याच कारणामुळे करण जोहरने मला अद्याप माफ केलं नसावं...”
रवीनाला ‘कुछ कुछ होता है’मध्ये कोणती भूमिका ऑफर झाली असावी, याचा अंदाज तुम्ही बांधू शकताच. तर तिला चित्रपटातील टीनाचा रोल ऑफर झाला होता. रवीनाने नकार दिल्यावर ही भूमिका राणी मुखर्जीच्या झोळीत पडली. या चित्रपटाने राणीला लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचवले.