"वजन तर कमी होऊ शकतं. पण,तुझ्या चेहऱ्याचं काय?" ; वजनावरुन ट्रोल करणाऱ्याला रविनाचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2022 10:58 AM2022-05-11T10:58:35+5:302022-05-11T10:58:58+5:30
Raveena tandon: अलिकडेच रविनाने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एकेकाळी वाढलेल्या वजनावरुन तिला कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते हे सांगितलं.
बहुचर्चित ठरलेला KGF चॅप्टर 2 (KGF Chapter 2) हा चित्रपट काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. KGF प्रमाणेच या दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांकडून तितकीच पसंती मिळाली. त्यामुळे सध्या हा चित्रपट आणि त्यातील कलाकार चर्चेत आहेत. या चित्रपटात अनेक दिग्गज कलाकार झळकले असून अभिनेत्री रविना टंडन (Raveena Tondon) हिने रमिका सेन (Ramika Sen) ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे तिची भूमिका विशेष गाजली. अलिकडेच रविनाने या चित्रपटासंदर्भात एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एकेकाळी तिला आणि ऐश्वर्याला (Aishwarya Rai Bachchan) वाढत्या वजनावरुन कशा प्रकारे ट्रोल केलं होतं हे सांगितलं. तसंच या मुद्द्यावरुन ती स्टँड घेत तिची रोकठोक प्रतिक्रियाही दिली.
अलिकडेच रविनाने 'गुड टाइम्स'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने एकेकाळी वाढलेल्या वजनावरुन तिला कशा प्रकारे प्रश्न विचारण्यात आले होते हे सांगितलं.
"हा किस्सा २०११ चा आहे. त्यावेळी ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला होता. आता बाळाला जन्म दिल्यानंतर सहाजिकच आईचं वजन थोडं वाढतं. त्यावेळी ऐश्वर्याचंही वजन वाढलं होतं. तसंही प्रत्येकाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते. त्यामुळे शरीर पूर्ववत आणायचं असेल तर त्यासाठी थोडा वेळ लागतो आणि हे ठीक आहे. त्यावेळी तिच्या बाळाप्रती काही जबाबदाऱ्या होत्या. त्यामुळे तिने तिच्यासोबत किंवा बाळासोबत कसं रहावं, काय डाएट करावं हे तिचं तिने ठरवलं पाहिजे. ना की मीडियाने किंवा अन्य कोणी तिला सांगितलं पाहिजे", असं रविना म्हणाली.
पुढे ती म्हणते, माझ्यावरदेखील ही वेळ आली होती. ज्यावेळी मी माझ्या मुलाला जन्म दिला त्यावेळी माझंही वजन खूप वाढलं होतं. मला चांगलं आठवतंय त्यावेळी मी काम करायलाही सुरुवात केली होती आणि एका प्रेस कॉन्फरन्समध्ये गेले होते. या प्रेस कॉन्फरन्समध्ये अनेकांनी मला माझ्या वाढलेल्या वजनावरुन असंख्य प्रश्न विचारले. या पत्रकार परिषदेत "रविनाजी तुम्ही किती जाड झालात आणि काय मस्त दिसायचात. आता काय रिअॅलिटी शो करताय", असा प्रश्न एकाने मला विचारला. त्यावर मी स्टँड घेत त्याला थेट उत्तरं दिलं होतं. "हे बघ भाऊ, वजन तर कमी होऊ शकतं. पण, तुझ्या चेहऱ्याचं काय?" असा प्रतिप्रश्न मी त्याला विचारला होता, असं रविना म्हणाली.
दरम्यान, रविना टंडन बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आजवरच्या कारकिर्दीत तिने असंख्य सुपरहिट चित्रपट दिले आहेत. उत्तम अभिनयासह तिचे अनेक गाणीही लोकप्रिय झाल्याचं पाहायला मिळतं. गेल्या कित्येक वर्षांपासून रविना बॉलिवूडमध्ये तिचं स्थान भक्कम करुन आहे.