आईकडून ५०० रुपये घेऊन पळून मुंबईत आला होता हा अभिनेता, आता लढवणार निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2019 01:29 PM2019-04-16T13:29:30+5:302019-04-16T13:29:57+5:30
वडीलांना अभिनय केलेला आवडत नसल्यामुळे आईने या अभिनेत्याला पाचशे रुपये देऊन पळून जायला सांगितले.
अभिनेता रवी किशन यांना भाजपने गोरखपूर येथून लोकसभेचे तिकीट देण्यात आले आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे वास्तव असलेल्या गोरखपूर मतदारसंघात भाजपाने भोजपुरी स्टार रवि किशन याला उमेदवारी दिली आहे. यापूर्वी त्याने २०१४ साली काँग्रेसच्या तिकिटावर जौनपूर येथून निवडणूक लढवली होती.
रवी किशन भोजपुरी चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार असून करियरच्या सुरूवातीच्या काळात त्याला खूप संघर्ष करावा लागला होता. त्याच्याकडे खाण्यासाठी पैसेदेखील नव्हते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार, रवी किशनने एका मुलाखतीत सांगितले होते की, माझ्या वडिलांचा दुग्धव्यवसाय होता. तो काही कारणास्तव बंद झाला. त्यामुळे माझ्या वडिलांची इच्छा होती की तो व्यवसाय पुन्हा सुरू व्हावा.
त्याने पुढे सांगितले की, माझे वडील मला नेहमी सल्ला द्यायचे. ते म्हणायचे की आपली एनर्जी चांगल्या कामांसाठी वाचवून ठेव. मुलींच्या मागे धावू नकोस. नेहमी एकाच महिलेशी प्रामाणिक राहा. पुरुष सेक्स वर्कर बनू नकोस. जर माझ्या वडिलांनी मला मारले नसते तर मी ड्रग अॅडिक्ट झालो असतो.
रवीला अभिनयाची आवड होती. यातच गावातील रामलीलामध्ये तो सीतेची भूमिका करायचा. त्याच्या वडिलांना हे अजिबात आवडत नव्हते. एकदा वडिलांनी त्याला पट्ट्याने देखील मारले होते. वडिल म्हणाले होते, हे काय नाच गाणे करतोस. एके दिवशी आईने माझ्या हातात ५०० रूपये ठेवले आणि म्हणाली घरातून पळून जा. त्यानंतर मी गाव सोडून मुंबईला आलो.
रवी किशन १९९०मध्ये गाव सोडून मुंबईला आला. मुंबईमध्ये त्याच्या डोक्यावर छप्परही नव्हते. रवी किशन दोन वेळचे जेवण मिळवण्यासाठी काम शोधत राहायचा. थोडे पैसे कमावल्यानंतर ते दोन रुपयांचा वडापाव खाऊन झोपी जायचा.
१९९१मध्ये पितांबर या चित्रपटात रवीला काम करण्याची संधी मिळाली. त्यानंतर त्याने १९९६मध्ये शाहरूख खान सोबत सिनेमा आर्मीमध्ये काम केले. रवी किशनला खरी ओळख २००३मध्ये प्रदर्शित झालेला सलमान खानचा सिनेमा तेरे नाममधून मिळाली.