ओशोंच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखले का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 19:10 IST2021-02-23T19:03:58+5:302021-02-23T19:10:11+5:30
ओशो यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे

ओशोंच्या भूमिकेत दिसणाऱ्या या अभिनेत्याला तुम्ही ओळखले का?
अध्यात्मिक गुरू आचार्य रजनीश यांचं नाव नेहमीच वादात राहिलेलं आहे. आचार्य रजनीश यांना ओशो म्हणूनही ओळखलं जातं. त्यांच्यावर आजवर अनेक लघुपट बनवण्यात आले आहेत. आता ओशो यांच्या जीवनावर एक चित्रपट बनवण्यात येणार आहे आणि या चित्रपटात भोजपुरी सुपरस्टार रवी किशन ओशोंच्या भूमिकेत दिसणार आहे.
रवी किशनचा ओशो यांच्या वेशातील फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रवी किशनचा मेकअप इतका सुंदर करण्यात आला की, या भूमिकेत कोणता कलाकार आहे हे ओळखणे देखील कठीण जात आहे.
या चित्रपटाचे नाव 'सिक्रेट्स ऑफ लव्ह' असे असून या चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश एस. कुमार करणार आहेत. ओशोंचं तत्त्वज्ञान, त्यांचा जीवन प्रवास आणि जगभरात प्रसिद्ध झाल्यानंतर अमेरिकेतील सरकारसोबत त्यांचा झालेला वाद या चित्रपटात दाखवला जाणार आहे.
या चित्रपटातील भूमिकेविषयी रवी किशनने मीडियाशी बोलताना सांगितले की, कोणत्याही व्यक्तीची भूमिका साकारणे हे कठीण असते. त्यामुळे या भूमिकेसाठी मला प्रचंड अभ्यास करावा लागला. मी त्यांच्याविषयी अनेक पुस्तकं वाचली आहेत. ओशो यांच्यासारखे माझे डोळे असल्याने या भूमिकेसाठी मी योग्य असल्याचे रितेशचे म्हणणे होते. त्यामुळे या भूमिकेसाठी माझी निवड करण्यात आली. या भूमिकेसाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे.