बलात्काराच्या किंचाळीला चित्रपटांनी फोडली वाचा !
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2018 12:39 PM2018-04-15T12:39:48+5:302018-04-15T18:09:48+5:30
-रवींद्र मोरे यूपीमधील उन्नाव आणि जम्मू-कश्मीरच्या कठुआ मध्ये अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेला गॅँगरेप आणि त्यानंतर झालेल्या हत्यांवरुन संपूर्ण देशात ...
यूपीमधील उन्नाव आणि जम्मू-कश्मीरच्या कठुआ मध्ये अल्पवयीन मुलींवर करण्यात आलेला गॅँगरेप आणि त्यानंतर झालेल्या हत्यांवरुन संपूर्ण देशात संताप व्यक्त केला जात आहे. लोक सोशल मीडियापासून ते रस्त्यांवर उतरुन या मुलींसाठी न्याय मिळण्याची मागणी करत आहेत. विशेष म्हणजे या मृत मुलींना न्याय मिळून देण्यासाठी बॉलिवूडचे काही सेलेब्सदेखील पुढाकार घेताना दिसत आहेत. बॉलिवूडने आताच नव्हे तर या अगोदरही बलात्काराच्या किंचाळींना चित्रपटांच्या माध्यमातून वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. जाणून घेऊया त्या चित्रपटांबाबत...
* मातृ
२०१७ मध्ये रिलीज झालेला रवीना टंडनचा 'मातृ' हा चित्रपट बलात्कारावरच आधारित आहे. या चित्रपटात एका आईसमोर तिच्या मुलीवर बलात्कार होतो आणि त्यानंतर ती बलात्कारांचा सुळ घेते, म्हणजेच 'मातृ' एका आईची बदला म्हणजे सुळ घेण्याची कथा आहे. बलात्कारानंतर एक आई कशाप्रकारे प्रशासन अणि संपूर्ण जगाशी लढते आणि आपल्या मुलीचा बदला घेते, हा संपूर्ण अनुभव पाहणे म्हणजे अंगावर शहारे येण्यासारखे आहे.
* पिंक
२०१६ मध्ये रिलीज झालेला अमिताभ बच्चन स्टारर 'पिंक' या चित्रपटात तापसी पन्नूचे यौन शोषण झालेले दाखविण्यात आले आहे. त्यावरुन तापसीचा आणि तिच्या मैत्रिणींचा समाजात खूपच तिरस्कार केला जातो. त्यामुळे त्यांचे जगणे खूपच त्रस्त होते. मात्र अभिताभ बच्चन त्यांना साथ देतात आणि न्यायदेखील मिळून देतात. चित्रपटात अभिताभने एका वकिलाची भूमिका साकारुन सर्व गुन्हेगारांनाशिक्षेस पात्र ठरवतात. या चित्रपटाची नॅशनल फिल्म अवॉर्ड्समध्ये सामाजिक मुद्यावरील सर्वश्रेष्ठ चित्रपट म्हणून निवड झाली होती.
अॅँग्री इंडियन गॉडेस
दिग्दर्शक पान नलिनच्या या चित्रपटात सात महिलांची कहाणी दाखविण्यात आली आहे. चित्रपटात बलात्कार, महिलांना सेक्स आॅब्जेक्ट्स सारखे प्रदर्शित करणे, लैंगिक समानता अशा अनेक विषयांना एकसोबत वाचा फोडण्यात आली होती. चित्रपटात तनिष्ठा चॅटर्जी, संध्या मृदुल, सारा जेन डायस, अनुष्का मनचंदा, राजश्री देशपांडे आदी कलाकारांनी भूमिका साकारली होती. हा चित्रपट २०१५ मध्ये रिलीज झाला होता.
* दामिनी द विक्टिम
शाहिद काजमी दिग्दर्शित २०१३ मध्ये रिलीज झालेला चित्रपट 'दामिनी द विक्टिम' मध्ये बलात्कारानंतर महिलेची शारीरिक आणि मानसिक अवस्था काय होते हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. चित्रपटात अभिनेत्री सोमन मनहासने मुख्य भूमिका साकारली असून अभिनेता रघुवीर यादवनेही यात गेस्ट स्टार म्हणून भूमिका केली आहे.
* पिता
संजय दत्त स्टारर २००२ मध्ये रिलीज झालेला 'पिता' हा चित्रपट म्हणजे एक बाप आणि त्याच्या मुलीवर झालेल्या बलात्काराची अतिशय दुखद कहाणी आहे. या चित्रपटात ठाकु रचा मुलगा मुलीवर बलात्कार करतो आणि त्यानंतर एक बाप आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा कसा बदला घेतो हे दाखविण्यात आले आहे. मुलीच्या आईची भूमिका नंदिता दासने साकारली आहे.