‘ओम शांती ओम’च्या गाण्यात साऱ्या बॉलिवूडने झाडून हजेरी लावली, पण आमिर दिसला नाही, असं का?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:00 AM2021-11-22T08:00:00+5:302021-11-22T08:00:07+5:30
‘Om Shanti Om’ हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर या सिनेमातील ‘दिवानगी दिवानगी’ हे गाणं तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. या गाण्याची अमाप चर्चा झाली.
2007 साली प्रदर्शित झालेला ‘ओम शांती ओम’ ( Om Shanti Om ) हा सिनेमा आठवतं असेलच. दीपिका पादुकोणचा (Deepika Padukone) पहिला सिनेमा असल्यानं या सिनेमाची उत्सुकता होतीच. शिवाय सिनेमाशी शाहरूख खानचं (Shah Rukh Khan) नाव जोडलं होतं, त्यामुळे सिनेमाची प्रचंड क्रेझ होती. सिनेमा आला आणि बॉक्स ऑफिसवर या सिनेमानं अगदी छप्परफाड कमाई केली. हा सिनेमा तुम्ही पाहिला असेल तर या सिनेमातील ‘दिवानगी दिवानगी’ हे गाणं तुम्ही कधीच विसरू शकणार नाही. या गाण्याची अमाप चर्चा झाली. कारणही तसंच होतं.
या एका गाण्यात बॉलिवूडमधील दिग्गज चेहरे एकत्र आणण्याचं काम फराह खानने केलं होतं. फराह खान ‘जॉन जानी जनार्दन’ या गाण्याची फॅन होती. या गाण्यात त्यावेळचे अनेक टॉप-स्टार्स झळकले होते. राज कपूर, शम्मी कपूर, धर्मेन्द्र अशा एक एक दिग्गज स्टार्सनी या गाण्यात कॅमिओ केला होता. फराहलाही असंच एक गाणं करायचं होतं. ‘जॉन जानी जनार्दन’ याच गाण्यावरून बॉलिवूडमधीज जमेल तितके स्टार्स नाचवण्याची आयडिया फराहला सुचली आणि तिने ती प्रत्यक्ष साकारली होती.
गाण्यात शाहरूख होताच, पण सलमान खान, सैफ अली खान, रेखा यांच्यासह 62 कलाकार या गाण्यात थिरकताना दिसले होते. खरं तर फराहला देवानंद हवे होते, दिलीप कुमारही हवे होते. पण देवानंद यांनी म्हणे कॅमिओ करण्यास नकार दिला आणि दिलीप कुमार तब्येतीमुळे या गाण्याचा भाग होऊ शकले नाही. अमिताभ बच्चन अभिषेक व ऐश्वर्याच्या लग्नाच्या तयारीत बिझी असल्याने त्यांनीही नकार कळवला. नकार कळवण्यांमध्ये आणखी एक सुपरस्टार होता. तो म्हणजे आमिर खान.
खरं तर या गाण्यात आमिर, शाहरूख व सलमान या तीन ‘खान’ मंडळींना एकत्र नाचवायची फराहची भरून इच्छा होती. तिने सलमान व आमिरला विनंती केली. सलमान तर आला. पण आमिर टाळाटाळ सुरू केली. फराहने बरीच प्रतीक्षा केली. पण सलग दहा दिवस वाट पाहूनही आमिर काही आला नाही. तेव्हा फराह समजायचं ते समजली. मी ‘तारें जमीं पर’च्या एडिटींगमध्ये बिझी असल्याने मला येणं शक्य नाही, असं कारण सांगून आमिरने फराहपासून पिच्छा सोडवला. अखेर आमिरशिवाय हे गाणं शूट झालं.