दबंग खानचा एकही मित्र 'या' कारणामुळे जाऊ शकत नाही 'बिग बॉस'च्या घरात, सलमानने केला खुलासा
By तेजल गावडे | Published: September 27, 2019 07:15 AM2019-09-27T07:15:00+5:302019-09-27T07:15:00+5:30
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय व वादग्रस्त रिएलिटी शो 'बिग बॉस'चा १३वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या शोचं सूत्रसंचालन बॉलिवूडचा दबंग खान सलमान करणार आहे. सलमानचं सूत्रसंचालन करण्याचं यंदा १०वं वर्षे आहे. यानिमित्ताने त्याच्याशी केलेली ही बातचीत...
- तेजल गावडे
: यंदाच्या सीझनची खासियत काय आहे?
पहिले चार आठवडे धमाकेदार असणार आहेत. साधारण दोन आठवडे बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना एकमेकांना समजून घेण्यासाठी लागतो. मात्र यावेळेस स्पर्धक बिग बॉसच्या घरात दाखल झाल्यानंतर त्यांचा प्रवास जलदगतीनं सुरू होणार आहे. तसेच प्रेक्षकांना सरप्राईजदेखील मिळणार आहे. यंदाचे बिग बॉ़सचे घर लोणावळ्यात नसून मुंबईतील फिल्मसिटी येथे उभारण्यात आलं आहे. बिग बॉसच्या घराला म्युझियमची थीम देण्यात आली आहे.
: लोणावळा ऐवजी 'बिग बॉस'चं घर फिल्मसिटीत उभारण्यात आलंय, त्याबद्दल काय सांगशील?
लोणावळा व खंडाळा या ठिकाणांना बिग बॉसमुळे पर्यटन आणि रोजगारासाठी वाव मिळाला. मात्र तिथे मोठी टीम सांभाळणं चॅलेंजिंग होतं. फिल्मसिटीमध्ये रिसोर्स उपलब्ध करणं खूप सोप्पे आहे. त्यामुळे कदाचित खर्चही थोडाफार कमी होईल. जे स्टार्स प्रमोशनसाठी येतील, त्यांच्यासाठी देखील ये-जा करणं सोप्पे राहिल. कारण संध्याकाळी ४ नंतर त्या भागात जास्त ट्राफिक असते. त्यामुळे त्यावेळी थोडेफार हेक्टिक होऊ शकतं.
: एकीकडे मेट्रो कारशेडला विरोध होत असताना पत्रकार परिषदेत तू मेट्रोनं एन्ट्री केलीस, यामागे काही उद्देश होता का?
आमची कलर्स वाहिनीची जी क्रिएटिव्ह टीम आहे ती खूपच क्रिएटिव्ह आहे. त्यांनी यंदाचा सीझन स्पीडवर आधारीत आहे. त्यामुळे त्यांच्या डोक्यात मेट्रो आली. सध्या मेट्रो (फास्टेस्ट वे ऑफ कम्युनिटींग) जलद परिवहन व्यवस्था प्रणाली आहे. चांगलं आहे मुंबईत मेट्रो आली आहे. मी पण मेट्रोतून या शोसाठी एन्ट्री केली. शोच्या अनावरणाला एक वेगळेपण प्राप्त झालं. गेल्या वर्षी आम्ही हा शो गोव्यात लाँच केला होता आणि त्याच्याआधी आम्ही ओशिवऱ्यातील तारापूर गार्डनमध्ये केला होता. तर ते दरवेळेस वेगळं असं काहीतरी क्रिएटिव्हीटी शोधून आणत असतात. मला जर शो लाँच करायचा असता तर मी स्टुडिओतच ठेवला असता.
: 'बिग बॉस'मध्ये गेली ३ वर्षे सेलिब्रेटींसोबत सामान्य लोक स्पर्धक होते. मात्र यंदाच्या सीझनमध्ये फक्त सेलिब्रेटीच स्पर्धक असणार आहे, याबद्दल तुझं काय मत आहे?
'बिग बॉस'ची रिसर्च टीम आहे. तीन वर्षे बिग बॉसच्या घरात सामान्य लोकांचाही समावेश होता. मात्र यंदा फक्त सेलिब्रेटीज बिग बॉसच्या घरात पहायला मिळणार आहे. पण नंतर माहीत नाही की सामान्य व्यक्तींचा समावेश करतील की नाही.
: मागील वर्षी 'बिग बॉस'ला हवा तितका प्रतिसाद मिळाला नव्हता, त्याबद्दल तूला काय वाटतं?
'बिग बॉस' शोला मिळणारा प्रतिसाद बऱ्याच गोष्टींवर अवलंबून आहे. प्रेक्षकांना स्पर्धक आवडत नसेल किंवा टास्क आवडत नसेल, वा इतर कारणांमुळे ते शो पाहत नसतील. मागील वर्षी रोमांस, वादविवाद व भांडणं अशा बऱ्याच गोष्टी पहायला मिळाल्या होत्या. एका कुटुंबात जर एवढे लोक एकत्र राहतील तर त्यांच्यातही वाद व भांडणं होणे साहजिकच आहे. बिग बॉसच्या घरात तर सगळे एकमेकांशी स्पर्धा करत असतात. त्यामुळे वादविवाद, भांडणं होणं स्वाभाविक आहे. बेस्ट फ्रेंडही बनतात तरी त्यांच्यातही भांडणं होतात. कधीकधी टास्क असतील तेव्हा ४८ तास झोपायला मिळत नाही. खाण्यावर मर्यादा, तसेच तिथे जे उपलब्ध आहे तेच खायचे. मोबाईल वापरायला बंदी, पुस्तकं वाचण्याचीही सोय नाही. सकाळी उठा, घर साफ करा, टास्क पूर्ण करा, हेच सगळं घरात चालू असतं. त्यामुळे बिग बॉसच्या घरात जे काही सुरू आहे त्यात समतोल साधला गेला आहे की नाही हे, प्रेक्षक व चाहतेच ठरवू शकतात. त्याप्रमाणे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया शुक्रवारी व शनिवारी मिळत असतात.
: 'बिग बॉस'च्या शोचा होस्ट म्हणून तुझ्यावर कोणतं प्रेशर असतं का?
अजिबात प्रेशर नसतं. जर स्पर्धक घराच्या आत टास्क खेळत नसतील किंवा कोणत्या गोष्टीत सहभाग घेत नसतील तर मला शनिवार व रविवारी येऊन त्यांना मला जाब विचारावा लागतो. त्यामुळे माझं काम वाढतं. तसेच या शोमध्ये काय बरोबर आहे आणि काय चुकीचं हे समजून घेण्यासाठी माझ्यासमोर सर्वात मोठं चॅलेंज असतं ते म्हणजे शो दररोज पाहणं. त्यासाठी मला जसा वेळ मिळेल म्हणजेच कामाच्यामधील ब्रेक किंवा लंच ब्रेक असेल वा रात्रीचा रिकामा वेळ.. त्या वेळेत मी एपिसोड्स पाहतो.
: तुझ्या फ्रेंड लिस्टमधील कोणाला तुला बिग बॉसच्या घरात स्पर्धक म्हणून पहायला आवडेल?
कुणालाच नाही. कारण माझ्या फ्रेंड लिस्टमधील कोणीच 'बिग बॉस'च्या घरात सर्व्हाइव्ह करू शकत नाही. (हसत-हसत) ते स्वतःच्या घरात सर्व्हाइव्ह करू शकत नाहीत ते बिग बॉसच्या घरात काय सर्व्हाइव्ह करणार आहेत.