सौंदर्याची मलिका जयाप्रदा कधीच बनु शकल्या नाही आई, विवाहीत पुरूषासह अडकल्या होत्या लग्नबंधनात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2020 10:38 AM2020-04-03T10:38:01+5:302020-04-03T10:43:10+5:30
१३व्या वर्षी रुपेरी पडद्यावर एंट्री मारणाऱ्या जयाप्रदा १७ वर्षांत बड्या स्टार बनल्या.
आपलं सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर जयाप्रदा यांनी रुपेरी पडद्यावर अधिराज्य गाजवलं आहे. तेलुगू, तमिळ, कन्नड, मल्ल्याळम, हिंदी, बंगाली आणि मराठी चित्रपटसृष्टीत जयाप्रदा यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. जयाप्रदा यांनी आपल्या अभिनयाने अनेक चित्रपट गाजवले. या भूमिकांनी त्यांना अमाप प्रसिद्धी आणि पैसा मिळवून दिला. मात्र अभिनय कारकिर्द सुरू करताना त्यांनाही अथक मेहनत करावी लागली. १९७४ साली तेलुगू चित्रपट ‘भूमी कोसम’मधून त्यांनी अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. १९७९ साली रिलीज झालेल्या सरगम चित्रपटातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. बालपणापासून जयाप्रदा यांनी अभिनयाला सुरूवात केली होती.
१३व्या वर्षी रुपेरी पडद्यावर एंट्री मारणाऱ्या जयाप्रदा १७ वर्षांत बड्या स्टार बनल्या. एक चांगल्या अभिनेत्री असलेल्या जयाप्रदा या उत्तम नृत्यांगणाही आहेत. अष्टपैलू अभिनेत्री अशी त्यांची ओळख आहे. त्यांनी हिंदीत कामचोर, शराबी, मां, थानेदार, संजोग, मकसद, तोहफा, आज का अर्जुन, ऐलान-ए-जंग, सिंदूर, आखिरी रास्ता, गंगा जमुना सरस्वती अशा चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. राजकारणात आल्यानंतरही त्या चित्रपटात सक्रीय राहिल्या. त्यांनी सुरुवातीला १९९४ साली तेलुगू देसम पार्टी आणि त्यानंतर समाजवादी पक्षातून राजकारण केलं. चित्रपटांसह छोट्या पडद्यावरही जयाप्रदा आपल्या अभिनयाची जादू दाखवत आहेत. परफेक्ट पती या मालिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवलीय.
सुरूवातीपासून जयाप्रदा यांचे आयुष्यही हवेतसे समाधनाकारक राहिले नाही. लग्नानंतरही जयाप्रदा यांच्या पदरात आनंदाची लाट आलीच नाही. त्यांना नव-याकडून कधीच पत्नीचा दर्जा मिळाला नाही. ना त्या कधी आई होऊ शकल्या. निर्माता श्रीकांत नहाटा यांच्या त्या प्रेमात पडल्या. त्यावेळी हे अफेअरही खूप गाजले. जया प्रदा यांचे श्रीकांत यांच्यावर जीवापाड प्रेम होतं विशेष म्हणजे श्रीकांत नहाटा हे आधीच विवाहीत होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलं देखील आहे. सर्वकाही माहिती असूनही जया प्रदा यांनी श्रीकांत यांच्यासह लग्न करत संसार थाटला. मात्र श्रीकांत जयाप्रदा यांना हवातसा पत्नीचा दर्जा देऊ शकले नाहीत.
श्रीकांत यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट द्यावा असा जया प्रदा यांची ईच्छा होती. मात्र तसे झाले नाही. म्हणून श्रीकांत आणि जया यांच्यात नेहमीच खटके उडत राहिले. त्यांचे नाते हवे तसे लग्नानंतर घट्ट बनले नाही. जयाप्रदा यांना देखील स्वतःच मुल हवं होतं. मात्र श्रीकांत यांनी नेहमीच यागोष्टीकडे दुर्लक्ष केले. म्हणून त्या कधीच आई होऊ शकल्या नाही. शेवटी त्यांनी आपल्या बहिणीच्याच मुलाला दत्तक घेत त्याचा सांभाळ केला.