याच वेबसिरिजची आहे सध्या सगळीकडे चर्चा... वाचा कशी आहे Hotstar वरील Criminal Justice
By प्राजक्ता चिटणीस | Published: May 21, 2019 05:52 PM2019-05-21T17:52:27+5:302019-05-21T18:02:30+5:30
Criminal Justice या वेबसिरिजची कथा काय आहे आणि ही वेबसिरिज कोणत्या कारणासाठी पाहावी हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
सध्या चित्रपट, मालिकांपेक्षा वेबसिरिजची चर्चा सगळीकडेच जास्त आहे आणि त्यातही सस्पेन्स वाढवणाऱ्या वेबसिरिजचा तर बोलबाला आहे. सस्पेन्स, थ्रिलरच्या प्रेमात असणाऱ्या प्रेक्षकांनी Criminal Justice ही वेबसिरिज नक्कीच पाहिली पाहिजे. या वेबसिरिजची कथा काय आहे आणि ही वेबसिरिज कोणत्या कारणासाठी पाहावी हे तुम्हाला आज आम्ही सांगणार आहोत.
Criminal Justice मध्ये फर्स्ट कॅब चालवणाऱ्या एका सामान्य मुलाची कथा रेखाटण्यात आली आहे. आदित्य फुटबॉलमध्ये चॅम्पियन असतो. त्याला एमबीए करायचे असते. पण घरची परिस्थिती बेताची असल्याने तो वडिलांना कॅब चालवायला मदत करत असतो. त्याची बहीण गरोदर असल्याची खुशखबर त्याला देते. त्याच मुडमध्ये तो कॅब घेऊन जातो. त्याला रात्री एका पार्टीला जायचे असल्याने मिळालेली राईड लवकर संपवण्याचा तो प्रयत्न करत असतो. पण त्याचवेळात सान्या त्याच्या गाडीत बसते... तिचे काहीतरी बिनसलेले असल्याने ती सतत पोहोचण्याचे ठिकाण बदलत असते. यावरून त्या दोघांमध्ये वाद देखील होतो. पण ती आपली तक्रार करेल या भीतीने तो तिला इच्छित स्थळी पोहोचवतो. ती देखील राग शांत झाल्यानंतर त्याच्याशी मस्तपणे गप्पा मारते. तिला घरी पोहोचवल्यानंतर आदित्यच्या लक्षात येते की, सान्या तिचा मोबाईल गाडीत विसरली आहे. त्यामुळे तो मोबाईल देण्यासाठी तिच्या घरी जातो. त्यावेळी ती घरात एकटीच असते. ती त्याला घरात बोलावते. त्याला ड्रिंक ऑफर करते. आदित्य देखील तिच्यासोबत ड्रिंक घेतो. त्याचदरम्यान ती त्याला किस करते आणि किस करतानाच एक गोळी त्याच्या तोंडात टाकते आणि ते दोघे नकळतपणे एकमेकांच्या जवळ येतात. काही तासांनी झोपेतून उठल्यावर त्याच्या लक्षात येते की, त्या मुलीचा खून झालेला आहे. पण त्या गोळीमुळे काही तासात काय घडले हेच त्याला आठवत नसते. आदित्य घाबरून तिच्या बिल्डिंगच्या बाहेर जातो. पण त्यावेळी त्याला बिल्डिंगमधला एक माणूस पाहातो आणि सान्याच्या खुनाच्या आरोपात त्याला अटक केली जाते.
आदित्यच्या विरोधात सगळे पुरावे असल्याने त्याची रवानगी जेलमध्ये केली जाते. जेलमध्ये असलेले गुंड त्याला प्रचंड सतवतात. आपण या सगळ्यातून कधी बाहेर पडणार याची तो आतुरतेने वाट पाहात असतो. या प्रकरणामुळे फर्स्ट कॅबची बदनामी झाल्याने त्यांच्याकडून आदित्यचा खटला लढण्यासाठी अतिशय प्रसिद्ध वकिलाची निवड केली जाते. हा वकील त्याला या खटल्यातून बाहेर काढतो का? त्याने खून केला नाही हे कशाप्रकारे सिद्ध केले जाते? सान्याचा खरा खुनी कोण आहे याची उत्तरं तुम्हाला वेबसिरिज पाहिल्यानंतरच मिळतील.
Criminal Justice या वेबसिरिजची कथा प्रेक्षकांना खिळवून ठेवते. सान्याचा खरा खुनी कोण आहे हे कळल्यावर तर प्रचंड धक्का बसतो. वेबसिरिजच्या शेवटच्या भागापर्यंत आपली उत्कटता कायम राहाते. प्रत्येक भागानंतर आता पुढे काय होणार याची उत्सुकता वाढत जाते. विक्रांत मेस्सी, पंकज त्रिपाठी, अनुप्रिया गोएंका, रुचा इनामदार आणि जॅकी श्रॉफ यांनी यात खूपच चांगले काम केले आहे.
जेलमधील जीवन कसे असते, एका सामान्य कैद्याला तेथील गुंड कशाप्रकारे सतावतात तसेच जेलमध्ये आपलेच राज्य असावे यासाठी गुंडामध्ये सुरू असलेला वाद, पोलीस आणि कैद्यांमध्ये होत असलेला पैशांचा व्यवहार या गोष्टी Criminal Justice मध्ये खूप चांगल्याप्रकारे दाखवण्यात आल्या आहेत. केवळ यातील सस्पेन्स उलगडल्यानंतर काही गोष्टी मनाला पटत नाही. सान्याचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सोसायटीतले सीसीटिव्ही का तपासले नव्हते, तिचे घर बंद असताना खुनी घरात कशाप्रकारे शिरला, तिची हत्या अतिशय निघृणपणे करण्यात आली होती असे वेबसिरिजच्या सुरुवातीलाच दाखवण्यात आले आहे. पण खुनीने तिच्या शरीरावर इतके सारे वार का केले या प्रश्नांची उत्तरे अखेरपर्यंत मिळत नाहीत. पण तरीही ही वेबसिरिज सस्पेन्स टिकवून ठेवण्यात आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी ठरते.