या कारणामुळे जान्हवी कपूरवर आली होती तीन दिवस केवळ मॅगी खाऊन राहाण्याची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 10:56 AM2018-07-05T10:56:49+5:302018-07-05T11:15:21+5:30
जान्हवी कपूर आणि तिची आई दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावर तीन दिवस केवळ मॅगी खाऊन राहाण्याची वेळ आली होती. असे का घडले होते हे जान्हवीने नुकतेच धडक या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी सांगितले आहे.
जान्हवी कपूर धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि प्रसिद्ध निर्माते बोनी कपूर यांची मुलगी असल्याने तिच्या बॉलिवूडच्या पदार्पणाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. धडक हा चित्रपट सैराट या मराठी चित्रपटाचा रिमेक असून या चित्रपटात जान्हवीसोबत इशान खत्तरची मुख्य भूमिका आहे. धडक हा चित्रपट येत्या 20 जुलैला प्रदर्शित होणार असल्याने या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन सध्या जान्हवी करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कोणतीही कमतरता पडू नये याची ती काळजी घेत आहे.
जान्हवीने या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान नुकताच एक रंजक किस्सा सांगितला. 2005 मधील जुलै महिन्यात मुंबईत किती पाऊस पडला होता आणि त्यामुळे काय परिस्थिती निर्माण झाली होती याची सगळ्यांनाच कल्पना आहे. या पुरामध्ये जान्हवी कपूर आणि श्रीदेवी या दोघी अडकल्या होत्या. याविषयी जान्हवीने नुकतेच एका मुलाखतीत सांगितले. त्या दिवसाची आठवण काढत जान्हवी सांगते, मी, आई, माझी एक मैत्रीण आणि मैत्रिणीची आई असे आम्ही चौघे जण चित्रपट पाहाण्यासाठी गेलो होतो. आम्ही चित्रपटगृहात असल्याने बाहेर काय स्थिती आहे याची आम्हाला काहीच कल्पना नव्हती. आम्ही ज्यावेळी चित्रपटगृहाच्या बाहेर पडलो, त्यावेळी सगळीकडे केवळ पाणीच पाणी होते. इतक्या पाण्यात आम्ही घरपर्यंत पोहोचू शकत नाही याची जाणीव आम्हाला झाली होती. आम्ही ज्या चित्रपटगृहात चित्रपट पाहात होतो, त्याच्या अगदी जवळ आमच्या ओळखीच्या एका काकांचे म्हणजेच राज अंकलचे ऑफिस होते. त्यामुळे आम्ही सगळे तिथेच गेलो. पुराचे पाणी सगळीकडे जमल्यामुळे आम्हाला काही खायला मिळणे अशक्य होते. आम्ही केवळ मॅगी खाऊन तीन दिवस काढले होते. आजही पाऊस पडल्यानंतर मला तो दिवस आठवतो.
श्रीदेवी यांनी अनेक वर्षं बॉलिवूडवर राज्य केले आहे. त्यांनी एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांची मुलगी देखील त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बॉलिवूड गाजवेल अशी कपूर कुटुंबियांना खात्री आहे.