Rekha Birthday : साऊथ सुपरस्टारची लेक आहे रेखा, सध्या कुठे आहे तिचं उर्वरित कुटुंब?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 01:59 PM2022-10-10T13:59:33+5:302022-10-10T13:59:48+5:30
Rekha Birthday : सुरूवातीपासूनच रेखाचं पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं. रेखा ही साऊथचे दिग्गज अभिनेते जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे. जेमिनी गणेशन हे सुप्रसिद्ध तामिळ चित्रपट अभिनेते होते...
Rekha Birthday : रेखा या नावानं सर्वांना वेड लावलं. आजही तिची जादू कमी झालेली नाही. आज ती 68 वर्षांची झाली, पण आजही तिच्या सौंदर्यावर चाहते फिदा आहेत. रेखा आताश: चित्रपटात दिसत नाही. पण रिअॅलिटी शो व अवार्ड फंक्शनमध्ये मात्र अधूनमधून ती दिसते. पण आपलं खासगीपण जपणाऱ्या रेखाचं उर्वरित कुटुंब कुठे आहे? काय करते? हे तुम्हाला माहितीये का?
सुरूवातीपासूनच रेखाचं पर्सनल लाईफ प्रचंड चर्चेत राहिलं. रेखा ही साऊथचे दिग्गज अभिनेते जेमिनी गणेशन यांची मुलगी आहे, हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. गणेशन हे सुप्रसिद्ध तामिळ चित्रपट अभिनेते होते आणि आई पुष्पवल्ली ही सुद्धा एक अभिनेत्री होती.
रेखाला किती भाऊ-बहिण?
रेखाचं कुटुंब खूप मोठं आहे. जेमिनी गणेशन यांनी तीन लग्न केली होती. या तीन बायकांपासून जेमिनी यांना 8 मुलं झालीत. पहिल्या पत्नीपासून 4 मुली, दुसऱ्या पत्नीपासून दोन मुली (रेखा व राधा), तिसऱ्या पत्नीपासून एक मुलगा व एक मुलगी. रेखाच्या वडिलांनी कधीच रेखाला आपली मुलगी मानलं नाहीत. त्यामुळे रेखा कायम वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिली. रेखाचे वडिल जेमिनी गणेशन हे एकेकाळचे दिग्गज स्टार होते. त्यांच्या चार्मिंग्स लुक्सवर तरूणी अक्षरश: फिदा होत्या. पाच दशकांच्या करिअरमध्ये जेमिनी यांनी 200 पेक्षा अधिक चित्रपटांत काम केलं. सावित्रीसोबतची त्यांची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. दोघंही एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केलं. अर्थात काही वर्षांनी दोघं विभक्त झालेत.
एअर होस्टेस बनायचं स्वप्नं अधुरं राहिलं...
रेखाचा जन्म 10 ऑक्टोबर 1954 रोजी चेन्नईमध्ये झाला. चेन्नईच्या चर्च पार्क कॉन्व्हेंट स्कूलमध्ये तिचं शिक्षण सुरु होतं. मात्र, रेखाच्या नशिबी वेगळंच लिहिलं होतं. शाळेत प्रवेश मिळाला पण त्याचवेळी तिच्या घरात खूप गोंधळ सुरू होता. घरची आर्थिक परिस्थितीही चांगली नव्हती. त्यामुळे शिक्षण सुरू होण्यापूर्वीच अभ्यास संपला होता. खरं तर रेखाला एअर होस्टेस बनायचं होतं. पण तिच्या नशीबी अभिनेत्री व्हायचं लिहिलं असावं. वयाच्या 12 व्या वर्षी रेखा कॅमेºयापुढे उभी झाली. बालकलाकार म्हणून तिच्या करिअरला सुरूवात झाली. यानंतर कुटुंबाची परिस्थिती पाहून रेखाने फिल्मी दुनियेतच करिअर करण्याचा निर्णय घेतला. ‘सावन भादों’ या चित्रपटातून रेखाने हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. आणि या चित्रपटानंतर मागे वळून पाहिलंच नाही. रेखाने आपल्या करिअरमध्ये सिलसिला, उमराव जान, खून पसीना आणि लज्जा सारखे अनेक उत्तम चित्रपट दिले.
काय करतात रेखाच्या बहिणी?
सावत्र बहिण-भावंडांसोबत आजही रेखाचा चांगला बॉन्ड आहे. रेखाइतके तिचे बहिण-भावंड लोकप्रिय नाहीत. रेखाची सख्खी बहिण राधाने लग्नाआधी साऊथ इंडस्ट्रीत थोडंफार काम केलं. पण लग्नानंतर ती फिल्मी करिअर सोडून संसारात रमली. रेखाची दुसरी सावत्र बहिण रेवती ही डॉक्टर आहे. ती अमेरिकेत राहते. तिसरी बहिण डॉ. कमला सेल्वाराज चेन्नईत स्वत:चं हॉस्पीटल चालवते. ती स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. चौथी बहिण नारायणी गणेशन पत्रकार आहे. ती सायन्स, फिलॉसॉफी व हेरिटेजवर लिहिते. पाचवी बहिण विजया ही लोकप्रिय फिटनेस एक्स्पर्ट आहे. सहावी बहिण जया श्रीधर ही सुद्धा डॉक्टर आणि हेल्थ अॅडव्हाइजर आहे.