यूनिसेफच्या पदावरून प्रियंका चोप्राला हटवण्याची पाकिस्तानची मागणी, वाचा काय आहे हे प्रकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 04:38 PM2019-08-21T16:38:51+5:302019-08-21T16:39:30+5:30
डॉ. शिरीन एम मजारी यांनी पत्र लिहून प्रियंका चोप्राला युएनच्या गुडविल ॲम्बेसेडर पदावरून काढण्यात यावे असे म्हटले आहे.
प्रियंका चोप्रा ही युनिसेफची गेल्या काही महिन्यांपासून गुडविल ॲम्बेसेडर आहे. पण काही दिवसांपूर्वी एका पाकिस्तानी महिलेने प्रियंकाच्या या पदावर आक्षेप नोंदवला होता. आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या कॅबिनेट मंडळातील मानवाधिकार खाते सांभाळणाऱ्या डॉ. शिरीन एम मजारी यांनी युनिसेफ (UNICEF)च्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरला याबाबत पत्र लिहिले आहे.
डॉ. शिरीन एम मजारी यांनी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी प्रियंका चोप्राला युएनच्या गुडविल ॲम्बेसेडर पदावरून काढण्यात यावे असे म्हटले आहे. त्यांनी या पत्रात नमूद केले आहे की, तुम्ही प्रियंका चोप्राची युएनच्या गुडविल ॲम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. भारतातील मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन करत काश्मीर प्रश्नाचा निर्णय घेतला आहे. भारतातच्या कक्षेत असलेल्या काश्मीरमध्ये भारतीय सैनिकांकडून लहान मुले, महिला यांच्यावर गोळीबार केला जात आहे. भाजपा सरकार नक्षलवाद, नरसंहार या चुकीच्या रस्त्यांवर चालत आहे. पण असे असूनही प्रियंका चोप्राने भारतातील सध्याच्या स्थितीला पाठिंबा दिला आहे. एवढेच नव्हे तर भारताच्या संरक्षण मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलेल्या न्यूक्लिअर धमकीला देखील तिने पाठिंबा दिला आहे. हे सगळे शांती आणि सद्भावना या गोष्टींच्या विरोधात आहे. मोदी सरकारने काश्मीर प्रश्नात केलेल्या आंतराराष्ट्रीय नियमांच्या उल्लघनांचे देखील प्रियंकाने समर्थन केले आहे. या सगळ्यामुळे प्रियंकाला या पदावरून लवकरात लवकर हटवण्यात यावे.
Sent letter to UNICEF chief regarding UN Goodwill Ambassador for Peace Ms Chopra pic.twitter.com/PQ3vwYjTVz
— Shireen Mazari (@ShireenMazari1) August 21, 2019
मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून 'कलम 370' रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्या निर्णयाचे तीव्र पडसाद पाकिस्तानात उमटले. पाकिस्तानी पंतप्रधान इम्रान खान यांनी संसदेत भाषण करताना भारताला थेट युद्धाची धमकी दिली होती.