प्रसिद्ध शास्त्रीय गायक उस्ताद राशीद खान यांचे निधन; वयाच्या 55व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2024 05:42 PM2024-01-09T17:42:03+5:302024-01-09T17:44:01+5:30
राशीद खान यांच्यावर 22 नोव्हेंबर 2023 पासून रुग्णालयात उपचार सुरू होता.
Ustad Rashid Khan: शास्त्रीय संगीतातील दिग्गज गायक उस्ताद राशीद खान(वय 55) यांचे आज निधन झाले. 22 नोव्हेंबरपासून त्यांच्यावर कोलकाता येथील पीयरलेस हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांचे पार्थिव आज रात्री कोलकाता येथील पीस हेवन रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. उद्या, 10 जानेवारी रोजी त्यांच्यावर अंतिम दफनविधी करण्यात येईल.
Deeply saddened by the tragic demise of Ustad Rashid Khan, one of the greatest exponents of Indian classical music of our times.
— Mamata Banerjee (@MamataOfficial) January 9, 2024
A hugely respected vocalist with unparalleled genius in creating music, he made us proud by settling here and making Bengal his home. He and Soma,…
उस्ताद राशीद खान यांना 2022 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ममता बॅनर्जी म्हणाल्या की, उस्ताद राशीद खान यांच्या अकाली निधनाने त्यांना फार दुःख झाले आहे. राशीद खान यांचा दफनविधी शासकीय इतमामात केला जाईल. दरम्यान, उद्या राशीद खान यांचे पार्थिव रवींद्र सदनमध्ये ठेवण्यात येणार असून, तिथेच चाहते उस्तादांना अखेरचा निरोप घेऊ शकतील.
कोण होते राशीद खान?
उस्ताद राशीद खान यांचा जन्म 1 जुलै 1968 रोजी उत्तर प्रदेशातील बदाऊन येथे झाला. ते रामपूर-सहस्वान घराण्यातील होते. या घराण्याचे संस्थापक उस्ताद इनायत हुसैन खान होते, जे रशीद यांचे आजोबा आहेत. संगीताच्या सेवेसाठी त्यांना 2006 मध्ये पद्मश्री आणि संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. असे म्हटले जाते की, पंडित भीमसेन जोशी यांनी राशीद खानचे वर्णन 'भारतीय संगीताचे भविष्य' असे केले होते.
उस्ताद राशीद खान यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. निसार हुसेन खान आणि गुलाम मुस्तफा खान यांच्याकडून त्यांनी गायनाचे प्रशिक्षण घेतले. उस्ताद रशीद खान यांनी वयाच्या 11 व्या वर्षी पहिला संगीत कार्यक्रम सादर केला. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी कोलकाता येथील ITC म्युझिक रिसर्च अकादमीमध्ये प्रवेश घेतला. ते त्यांच्या वेगळ्या गायनाच्या शैलीसाठी प्रसिद्ध होते. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्येही आपला आवाज दिला आहे.
अनेक बॉलिवूड चित्रपटात गायन
करीना कपूर आणि शाहिद कपूरच्या 'जब वी मेट' चित्रपटातील 'आओगे जब तुम ओ सजना' हे गाणे त्यांचे खूप हिट झाले. याशिवाय त्यांनी 'किसना: द वॉरियर पोएट' चित्रपटातील काहे उजादी मोरी नींद, तोरे बिना मोहे चैन नहीं, माय नेम इज खान चित्रपटातील अल्ला ही रहम, तू बनजा गली, ही गाणी गायली आहेत.