"शिडीवरुन जोरात पडले पण.."; रेणुका शहाणेंचा आश्चर्यजनक खुलासा, 'हम आपके है कौन'मधील 'त्या' सीनच्या वेळेस काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 14:05 IST2025-04-17T14:04:33+5:302025-04-17T14:05:05+5:30
रेणुका शहाणेंनी 'हम आपके है कौन'मधील शिडीवरुन पडण्याचा सीन कसा शूट झाला याचा अनुभव सांगितला आहे (renuka shahane)

"शिडीवरुन जोरात पडले पण.."; रेणुका शहाणेंचा आश्चर्यजनक खुलासा, 'हम आपके है कौन'मधील 'त्या' सीनच्या वेळेस काय घडलं?
"हम आपके है कौन" सिनेमा पाहिला नाही (hum aapke hain kaun) असा एकही माणूस दिसणार नाही. सलमान खान, रेणुका शहाणे, माधुरी दीक्षित, मोहनीश बेहल या कलाकारांनी हा सिनेमा चांगलाच गाजवला. रेणुका शहाणेंनी (renuka shahane) सिनेमात पूजाची भूमिका साकारली होती. सिनेमात एक धक्कादायक ट्विस्ट येतो जेव्हा पूजा उंच शिडीवरुन खाली कोसळते आणि तिचा मृत्यू होतो. या सीनच्या वेळेस रेणुका शहाणेंना शिडीवरुन पडताना अजिबात लागलं नाही, याचा खुलासा त्यांनी एका मुलाखतीत केला.
शिडीवरुन पडण्याचा सीन कसा शूट झाला
रेणुका शहाणेंनी लोकशाहीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला की, "सूरज बडजात्यांच्या सिनेमामध्ये त्यांच्या कलाकारांना फुलासारखं जपतात. शिडीवरुन पडण्याच्या सीनचं जेव्हा शूटिंग करायचं होतं तेव्हा त्यांनी माझ्या क्लोजअप शॉटसाठी स्पॉन्जची मऊ शिडी बनवून घेतली होती. त्यानंतर स्नो बोर्डसारखा एक बोर्ड बनवून घेतला होता. त्यात मला झोपवलं होतं. मग अॅक्शन डायरेक्टरने तो बोर्ड खेचला. मग माझं डोकं त्या शिडीवरुन लागत जातं, असं दाखवायचं होतं. आणि शेवटी मुख्य शिडीवरुन मी उलटी होऊन पडणार, असा सीन होता."
"मी शिडीवरुन पडण्याचा सीन असा ब्रेकडाऊन करुन शूट करण्यात आला. त्यामुळे तुम्हाला तो सीन पाहताना वाटलं असेल की, किती लागलं असेल हिला. मला अजिबात लागलं नव्हतं. मला लागण्याचा खूप अभिनय करावा लागला," अशाप्रकारे रेणुका शहाणेंनी त्यांना आलेला अनुभव शेअर करुन आश्चर्यजनक खुलासा केला. रेणुका शहाणे लवकरच महेश मांजरेकर यांच्यासोबत 'देवमाणूस' या मराठी सिनेमात झळकणार आहेत.