अनेकदा आत्महत्येचे विचार आलेत, माझ्या लेकीने खूप काही सोसले...! पहिल्यांदा बोलली रिया चक्रवर्तीची आई
By रूपाली मुधोळकर | Published: October 8, 2020 01:35 PM2020-10-08T13:35:39+5:302020-10-08T13:37:24+5:30
रियाला जामीन मिळाल्याचे कळताच, तिची आई संध्या चक्रवर्ती भावूक झाली. ‘परमेश्वर आहे,’ असे म्हणत ती रडू लागली.
ड्रग्ज प्रकरणातील अटकेनंतर अभिनेत्री रिया चक्रवर्तीची सुमारे महिनाभराने जामिनावर सुटका झाली. रियाला जामीन मिळाल्याचे कळताच, तिची आई संध्या चक्रवर्ती भावूक झाली. ‘परमेश्वर आहे,’ असे म्हणत ती रडू लागली. गेल्या तीन महिन्यांचा काळ रियाच्या कुटुंबासाठी खूप कठीण होता. अद्यापही त्यांचा हा कठीण काळ संपलेला नाही. कारण रिया तुरुंगातून बाहेर आली असली तरी रियाचा भाऊ शौविक अद्यापही तुरुंगात आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत संध्या चक्रवर्ती यांनी पहिल्यांदा या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडत प्रतिक्रिया दिली. रियाने काय काय सोसले, हे त्यांनी सांगितले.
ती स्वत:ला कशी सावरणार?
माझी लेक घरी आली, यापेक्षा मोठा दिलासा नाही. तिने जे काही सोसले त्यातून ती बाहेर कशी पडणार? ती स्वत:ला कशी सावरणार? हे प्रश्न आमच्याही मनात आहेत. पण ती फाईटर आहे, ती यातून नक्की बाहेर पडणार. तिला यातून सावरण्यासाठी थेरपीची गरज आहे आणि मी तिच्यासाठी शक्य ते सर्व करणार. रिया तुरुंगातून बाहेर आली. पण अजूनही आमच्या समस्या संपलेल्या नाही. माझा मुलगा अद्यापही तुरुंगात आहे आणि तो तुरुंगात आहे हा विचार करून करून मी वेडी होतेय.
दरवाजाची बेल वाजती धडकी भरते...
रियाच्या एका शेजा-याने अलीकडे रिया व सुशांत 13 तारखेला एकत्र दिसले होते, असा दावा केला होता. रियाच्या आईने हा दावा फेटाळून लावला. मी त्या शेजारी महिलेला ओळखते. ती सुशांतची खूप मोठी चाहती होती. आमच्या घरी त्याला भेटायला ती अनेकदा आली होती. मात्र कुठल्याही पुराव्याशिवाय आत्ता ती हा दावा का करतेय, ते माहिती नाही. दरवाज्याची बेल वाजताच आम्हाला धडकी भरते. कोण येईल, याचा नेम नसतो. अनेकदा रिपोर्टर सीबीआय बनून आमच्या बिल्डिंगमध्ये शिरतात. यामुळे दरवाज्याबाहेर आम्हाला सीसीटीव्ही लावावे लागले, असे रियाच्या आईने सांगितले.
अनेकदा आत्महत्येचे विचार आलेत..
माझी मुलं जेलमध्ये असताना मला बेडवर कधी झोप येणार. कित्येक रात्री मी जागून काढल्या आहेत. अपरात्री जाग येते आणि पुढे काय घडेल या भीतीने झोप येत नाही. माझे कुटुंब उध्वस्त झालंय. अनेकदा माझ्या मनात आत्महत्येचे विचार आलेत. यानंतर मला थेरपी घ्यावी लागली. माझ्या मुलांसाठी मला जगायचे आहे, या विचाराने मी आत्महत्या करण्यापासून स्वत:ला रोखले. माझ्या मुलीचा मला अभिमान आहे. महिनाभरानंतर ती घरी आली आणि आल्याआल्या, तू का दु:खी आहेत. आपल्याला खंबीर बनून हे सगळे झेलायचे आहे, असे मला म्हणाली. हे सांगताना रियाच्या आईला अश्रू रोखता आले नाहीत.
सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया व तिचे कुटुंब अचानक चर्चेत आले. सुशांतच्या वडिलांनी रियावर अनेक गंभीर आरोप करत तिच्याविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्ज अँगल समोर आला आणि एनसीबीने रियाला याप्रकरणी अटक केली.