सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला 'लव्ह जिहाद' म्हणणाऱ्यांना रिचा चढ्ढाने चांगलंच सुनावलं; म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2024 10:31 AM2024-06-26T10:31:57+5:302024-06-26T10:35:13+5:30
सोनाक्षी-जहीरच्या लग्नावर काही लोक लव्ह जिहाद म्हणत टीका करत आहेत. यावर रिचा चढ्ढाने सोनाक्षीची बाजू घेत ट्रोलर्सला चांगलंच फैलावर घेतलं आहे (sonakshi sinha, richa chaddha)
सोनाक्षी सिन्हाने तिचा बॉयफ्रेंज जहीर इक्बालसोबत रविवारी २३ जूनला लग्नगाठ बांधली. ७ वर्ष एकमेकांना डेट केल्यावर सोनाक्षी-जहीरने एकमेकांशी लग्न केलं. कोणताही बडेजाव न करता रजिस्टर मॅरेज करत साधेपणाने या दोघांनी जवळचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांच्या उपस्थितीत एकमेकांशी लग्नगाठ बांधली. सोनाक्षीचंं लग्न झाल्यावर अनेक जण तिच्या लग्नावर 'लव्ह जिहाद' म्हणून टीका करत आहेत. यामुळे अभिनेत्री रिचा चढ्ढाने ट्रोलर्सना चांगलंच सुनावलं आहे.
लव्ह जिहाद म्हणणाऱ्यांना रिचा काय म्हणाली?
रिचा चढ्ढा ही सध्या गरोदर आहे. तरीही आसपास घडणाऱ्या घटनांवर तिचं बारीक लक्ष असतं. याशिवाय विविध घटनांवर ती तिचं मत नोंदवत असते. अशातच सोनाक्षी-जहीरच्या लग्नाला लव्ह जिहाद म्हणणाऱ्या नेटिझन्सला रिचाने चांगलंच फैलावर घेतलंय. रिचा म्हणाली, "प्रिय सोना आणि झहीर! तुमचा साधेपणा, तुमचं एकमेकांशी असलेलं नातं पाहून मला खूप आनंद झालाय. तुम्ही तुमच्याच दुनियेत खूश आहात याचा मला आनंद आहे! तू लग्नात व्यस्त असल्यामुळे मी तुझ्यासोबत फोटो काढू शकले नाही, पण अली आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझा उत्साह खूप छान होता!"
रिचा पुढे लिहिते, "तुम्ही एक अद्भुत जोडपे आहात. मी माझ्या गर्भधारणेच्या ९ व्या महिन्यात आहे. अशा परिस्थितीत इतक्या गर्दीचा सामना करुनही मी खूप आनंदी आहे. पुढे सोनाक्षी-जहीरला लग्नावरुन ट्रोल करणाऱ्यांना रिचा म्हणते, "बुरी नजर वाले तेरा मुंह फालतू. माझं तुम्हा दोघांवरही प्रेम आहे. एका अद्भुत मेजवानीसाठी धन्यवाद. शेवटी मी तुम्हाला आयुष्यभरासाठी आनंदी शुभेच्छा देते."
रिचा चढ्ढा आणि अलीनेही केला होता आंतरधर्मीय विवाह
सोनाक्षी-जहीरप्रमाणेच रिचा चढ्ढा हिनेही अभिनेता अली फजलसोबत आंतरधर्मीय विवाह केला आहे. रिचा चड्ढाने २०२२ मध्ये अली फजलसोबत लग्न केले. लग्नाआधी दोघांनी जवळपास ५ वर्षे एकमेकांना डेट केले होते. पुढे ४ ऑक्टोबर २०२२२ रोजी दोघांनीही एकमेकांशी लग्नगाठ बांधली. मात्र आंतरधर्मीय विवाहामुळे रिचालाही ट्रोलिंगचा सामना करावा लागला.