सुरू झाला ऋषी कपूर यांचा अंतिम प्रवास, फुलांनी सजवलीय अॅम्ब्युलन्स
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 03:52 PM2020-04-30T15:52:25+5:302020-04-30T17:53:14+5:30
ऋषी कपूर यांच्यावर थोड्याचवेळात अंतिम संस्कार केले जाणार आहेत.
काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.
मुंबईतील मरिन लाईन्स परिसरातील चंदन स्मशानभूमीत ऋषी कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असून त्यांचे पार्थिव रुग्णालयातून स्मशानभूमीत अॅम्ब्युलन्सने नेण्यात आले आहे. ही अॅम्ब्युलन्स फुलांनी सजवली असून त्यांच्या अंत्यविधीची तयारी स्मशानभूमीत सुरू आहे.
आदर जैन, अभिषेक बच्चन, अनिल अंबानी यांसारखे अनेक जण ऋषी कपूर यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचले आहेत. त्यांची पत्नी नीतू सिंग कपूर यांना सांभाळणे उपस्थित लोकांना कठीण जात आहे.
ऋषी कपूर गेल्या वर्षभरापासून कर्करोगाशी लढत होते. काल रात्री उशिरा त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांची त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केलेत. पण हे सगळे प्रयत्न निष्फळ ठरलेत. 2018 मध्ये ऋषी कपूर कॅन्सरवरील उपचारासाठी अमेरिकेला गेले होते. तेथे 11 महिने उपचार घेतल्यानंतर ते भारतात परतले होते.