ऋषी कपूर यांच्या तब्येतीविषयी त्यांची मुलगी रिद्धीमाने दिली ही माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2018 11:49 AM2018-11-07T11:49:06+5:302018-11-07T11:49:54+5:30
ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या कुटुंबियांतील मंडळी गेल्या काही दिवसांपासून बोलणे टाळत आहेत. पण त्यांची मुलगी रिद्धीमाने नुकतीच त्यांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे.
ऋषी कपूर सध्या आजारी असून उपचारासाठी अमेरिकेत आहेत. त्यांच्या पत्नी नीतू सिंग कपूर देखील गेल्या कित्येक दिवसांपासून त्यांच्यासोबतच आहेत. खुद्द ऋषी कपूर यांनी ट्विटरवरून त्यांच्या आजाराबाबत माहिती दिली होती. मी उपचारासाठी अमेरिकेला जात आहे, असे त्यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवरून सांगितले होते. त्यांना कुठला आजार झालाय, हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. ऋषी कपूर यांना कॅन्सर झाला असल्याच्या बातम्या मीडियात आल्या होत्या. पण या बातम्या चुकीच्या असून अद्याप तरी त्यांच्या केवळ टेस्ट सुरू आहेत असे त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांनी मीडियाशी बोलताना सांगितले होते.
ऋषी कपूर यांच्या आजारपणाविषयी त्यांच्या कुटुंबियांतील मंडळी गेल्या काही दिवसांपासून बोलणे टाळत आहेत. पण त्यांची मुलगी रिद्धीमाने नुकतीच त्यांच्या आजारपणाविषयी माहिती दिली आहे. रिद्धिमाने सांगितले आहे की, ऋषी कपूर यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या तब्येतीबाबत काहीही काळजी करण्याचे कारण नाहीये. त्यांच्या आरोग्याबद्दल आमचे कुटुंबीय कधीच चिंतेत नव्हते. ते फक्त रूटिन चेकअपसाठी गेले असून ते आजच नव्हे तर अनेक वर्षांपासून त्यांच्या सगळ्या तपासण्या नियमितपणे करत आहेत. लवकरच सगळे काही व्यवस्थित होईल असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे.
ऋषी कपूर अमेरिकेला रवाना झाल्यापासून त्यांना बॉलिवूडमधील अनेक मंडळी भेट देत आहेत. अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, सोनाली बेंद्रे यांसारख्या कलाकारांनी त्यांची भेट घेतली आहे. या भेटीचे फोटो देखील सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
ऋषी कपूर यांनी अमेरिकेला जाण्याआधी त्यांच्या फॅन्ससाठी ट्वीट केले होते. मी उपचारासाठी अमेरिकेत जातोय. मी लवकर परत येईल. कृपया कुठलेही तर्क काढू नये, असे ट्विट करत त्यांनी त्यांच्या फॅन्सना माहिती दिली होती. अर्थात आपल्या आजाराबद्दल त्यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता.
ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे तूर्तास जुही चावलासोबतच्या त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे. ऋषी कपूर अमेरिकेतून परतल्यानंतर त्यांच्या चित्रपटांच्या चित्रीकरणाला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे.