रितू नंदा यांच्या अंत्यदर्शनाला पोहोचले सेलिब्रेटी, कपूर कुटुंबियांना आवरले नाही अश्रू
By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 06:39 PM2020-01-14T18:39:42+5:302020-01-14T18:45:58+5:30
रितू नंदा यांच्या निधनाची बातमी समजताच कपूर आणि बच्चन कुटुंबियांतील लोकांनी त्यांच्या दिल्ली येथील घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक राज कपूर यांची मुलगी तसेच अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन हिच्या सासूबाई रितू नंदा यांचे आज निधन झाले. आज सकाळी रितू नंदा यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 71 वर्षांच्या होत्या. त्या दीर्घकाळापासून कॅन्सरशी झुंज देत होत्या. अभिनेता रणधीर कपूर यांनी या वृत्ताला दुजोरा देत रितू नंदा यांच्या निधनाची बातमी मीडियात जाहीर केली होती. सोबत नीतू कपूर आणि रिद्धिमा कपूर यांनीही सोशल मीडियाद्वारे रितू नंदा यांना श्रद्धांजली वाहिली होती.
रितू नंदा यांच्या निधनाची बातमी समजताच कपूर आणि बच्चन कुटुंबियांतील लोकांनी त्यांच्या दिल्ली येथील घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
त्यांच्या घराच्या बाहेरील काही फोटो मीडियात आले असून या फोटोत आपल्याला अभिषेक बच्चन, ऋषी कपूर, रणधीर कपूर, राजीव कपूर, आदार जैन, ऐश्वर्या राय, करण जोहर, गौरी खान आणि अमिताभ बच्चन दिसत आहेत.
नीतू कपूर यांनी रितू यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करत, ‘माझी प्रिय... तुझ्या आत्म्यास शांती लाभो,’ असे लिहिले. रितू नंदा यांना निखिल आणि नताशा अशी दोन मुले आहेत. राजन यांचा मुलगा निखिल नंदा अमिताभ यांचा जावई आहे. (अमिताभ यांची मुलगी श्वेता बच्चनचे निखिलसोबत लग्न झाले आहे. ) 2018 मध्ये रितू नंदा यांचे पती राजन नंदा यांचे निधन झाले होते. राजन नंदा एस्कॉर्ट्स ग्रूपचे चेअरमॅन होते.
एकाच दिवसांत 17000 पेन्शन पॉलिसीज विकल्याबद्दल रितू नंदा यांच्या नावाची नोंद गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये झाली होती. 80 च्या दशकात एलआयसीच्या एजंट म्हणून त्यांनी काम सुरू केले होते. अनेक वर्षं त्यांनी हे काम केले. यानंतर त्यांनी स्वत:ची एक खाजगी विमा कंपनीही सुरू केली होती. 1969 मध्ये त्यांनी प्रतिष्ठित सुरक्षा एजन्सी एस्कॉर्ट्स ग्रूपचे मालक राजन नंदा यांच्यासोबत विवाह केला होता. आठ वर्षांपूर्वी रितू यांना कॅन्सरने गाठले. तेव्हापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.