ऋषी कपूर यांनी पहिल्यांदा दिली कॅन्सर असल्याची कबुली! मानले कुटुंब व चाहत्यांचे आभार!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:07 PM2019-05-03T14:07:53+5:302019-05-03T14:09:34+5:30
ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र आता खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली आहे.
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर गेल्या अनेक महिन्यांपासून अमेरिकेत वैद्यकीय उपचार घेत होते. ऋषी कपूर उपचारासाठी अमेरिकेत रवाना झाल्यानंतर काहीच दिवसांत त्यांना कॅन्सर झाल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. पण ऋषी कपूर आणि त्यांच्या कुटुंबाने त्यांना कॅन्सर असल्याच्या वृत्ताचे खंडन केले होते. त्यामुळे ऋषी यांना कुठला आजार झाला, हे कळायला मार्ग नव्हता. मात्र आता खुद्द ऋषी कपूर यांनी त्यांना कॅन्सर होता, याची कबुली दिली आहे.
होय, एका मुलाखतीत ऋषी कपूर यांनी कॅन्सरशी दिलेल्या लढाईचे अनुभव सांगितले. ‘अमेरिकेत ८ महिन्यांचा उपचार होता. गतवर्षी १ मे रोजी माझ्या उपचाराला सुरुवात झाली होती. परमेश्वराच्या कृपेने आत्ता मी कॅन्सर मुक्त झालोय,’ असे ऋषी कपूर या मुलाखतीत म्हणाले. अर्थात कॅन्सर मुक्त झाल्यानंतर आणखी काही काळ त्यांच्यावर उपचार सुरु राहणार आहेत.
याचदरम्यान भारतात परतण्याच्या कल्पनेने ऋषी कपूर कमालीचे उत्सुक आहेत. मुलाखतीत त्यांनी आपली ही उत्सुकता बोलून दाखवली. ‘मला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायचा आहे. यासाठी किमान २ महिन्यांचा कालावधी लागेल. कॅन्सरचा विळखा सोडवणे एक मोठी गोष्ट आहे. माझे कुटुंब आणि माझ्या चाहत्यांच्या शुभेच्छा केवळ यामुळे हे शक्य झाले. मी त्यांचा आभारी आहे. विशेषत: नीतूचा मी प्रचंड आभारी आहे. ती माझ्यासोबत अगदी खंबीरपणे उभी राहीली. खाण्यापिण्याच्या बाबतीत माझ्यासारख्या व्यक्तिला हाताळणे कठीण आहे. पण तिने सगळे काही केले. माझी मुले रणबीर आणि रिद्धिमा यांनी माझ्या सगळ्या चिंता आपल्या खांद्यावर घेतल्या. माझ्यात संयम नावाची गोष्ट मुळीच नाही. कदाचित मला संयम शिकवण्यासाठी परमेश्वराने हा मार्ग अवलंबला असावा. या आजारातून मुक्त होणे एक अतिशय वेळखाऊ प्रक्रिया आहे. पण मृत्युच्या दाढेतून परत येत आयुष्याची भेट मिळणे शानदार असते,’असे ऋषी कपूर यांनी यावेळी सांगितले.