'चेहरे'च्या पोस्टर्सवर रिया चक्रवर्तीच्या नावाचा या कारणामुळे नव्हता उल्लेख, खुद्द निर्मात्यांनी केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2021 19:17 IST2021-04-20T19:17:11+5:302021-04-20T19:17:41+5:30
रिया चक्रवर्ती लवकरच चेहरे या चित्रपटात दिसणार आहे.

'चेहरे'च्या पोस्टर्सवर रिया चक्रवर्तीच्या नावाचा या कारणामुळे नव्हता उल्लेख, खुद्द निर्मात्यांनी केला खुलासा
अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी स्टारर ‘चेहरे या आपल्या आगामी सिनेमात रिया चक्रवर्तीची वर्णी लागली होती. मात्र ‘चेहरे’च्या पोस्टर्सवरून रियाचा चेहरा गायब दिसतोय. एकाही पोस्टरमध्ये तिचा चेहरा नाही. इतकेच नाही, प्रमोशनल कॅम्पेनमधून रिया चक्रवर्तीचे नाव गायब आहे. साहजिकच या सिनेमात रिया आहे की नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आता ‘चेहरे’चे निर्माते आनंद पंडित यांनी यावर उत्तर दिले आहे.
‘चेहरे’ चित्रपटाचे निर्माते आनंद पंडित यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर रियाचं नाव नसल्याबद्दल जेव्हा त्यांना विचारले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, मला तिच्या नावाचा उल्लेख न करण्यामागे काहीही कारण दिसत नाही. ती चित्रपटातल्या ८ कलाकारांपैकी एक आहे. आम्ही तिला खूप आधी साईन केले होते आणि तिने समाधानकारकरित्या तिचे काम पूर्ण केले आहे.
त्यांनी पुढे म्हटले की, चित्रपटाच्या बिझनेसच्या फायद्यासाठी रियाच्या परिस्थितीचा गैरफायदा घ्यायचा नाही. म्हणूनच आम्ही दुसऱ्या पोस्टरमध्ये तिच्या नावाचा उल्लेख करणे टाळले. तिच्या आयुष्यात ती बऱ्याच अडचणींना सामोरी गेली आहे. आम्हाला त्यात भर घालायची नाही. आम्ही तिला तेव्हाच समोर आणले जेव्हा तिला ते सोयीस्कर वाटले.
‘चेहरे’ या चित्रपटात अभिनेते अमिताभ बच्चन आणि इमरान हाश्मी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत या चित्रपटात अन्नू कपूर, क्रिस्टल डिसुझा, ध्रितीमन चटर्जी, रिया चक्रवर्ती आणि इतर कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. हा चित्रपट ९ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण आता त्याचे चित्रीकरण लांबणीवर पडले आहे.