'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझरला मिळतोय चांगला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 05:20 PM2018-10-31T17:20:05+5:302018-10-31T17:20:37+5:30
अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
अभिनेता आर. माधवनचा आगामी चित्रपट 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'चा टीझर नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या टीझरला अल्पावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. भारताच्या मंगळ मोहिमेवर आधारित हा चित्रपट असून या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेवन यांनी केले आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेतील (इस्रो) भूतपूर्व शास्त्रज्ञ एस. नंबी नारायणन यांच्यावर भाष्य करणारा 'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट' या चित्रपटाचा टीझर आणि पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. यावेळी नंबी नारायन यांचे संपूर्ण कुटुंब उपस्थित होते व यावेळी नंबी नारायनन खूप भावूक झाले होते.
'रॉकेट्री : द नंबी इफेक्ट'च्या या टीझरच्या सुरुवातीला रॉकेट लॉन्च होताना दाखविण्यात आले आहे. भारताने केवळ पहिल्याच प्रयत्नात मंगळ मोहीम फत्ते केली होती.तर ही मोहीम पूर्ण करण्यासाठी अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि रशियाच्या अंतराळ संशोधन संस्थेला अनुक्रमे १९ आणि १६ वेळा प्रयत्न करावे लागले होते. हे आकडेवारीच्या स्वरुपात दाखविण्यात आले आहे. टीझर पुढे-पुढे सरकत असताना 'अगर मैं आपसे यह कहू कि यह कारनामा हम २० साल पहले ही कर सकते थे तो…' असे आर. माधवनने म्हटले आहे.नंबी नारायणन हे इस्रोमधील एक शास्त्रज्ञ असून त्यांना १९९४मध्ये हेरगिरी प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली होती. नंबी नारायणन यांनी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाबाबतचा गोपनीय दस्तऐवज परकीयांच्या स्वाधीन केल्याचे आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. नंबी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.