हा प्रसिद्ध संगीतकार काम मिळवण्यासाठी करायचा अशी धडपड
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2019 07:15 AM2019-08-10T07:15:00+5:302019-08-10T07:15:01+5:30
या संगीतकाराने त्याच्या करियरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला आहे.
अनू मलिकने एक संगीतकार म्हणून आज त्याची बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाजीगर, रेफ्युजी, मैं हू ना यांसारख्या चित्रपटांसाठी त्याला सर्वोत्कृष्ट संगीतकाराचा पुरस्कार देखील मिळाला आहे. त्याची आजवरची अनेक गाणी गाजली आहेत. अन्नू मलिकसाठी इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास सोपा नव्हता. त्याने त्याच्या करियरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल केला आहे. त्याला रोहित शेट्टीचे वडील एम.बी.शेट्टी यांनी स्ट्रगलिंग डेजमध्ये एक खूप चांगला सल्ला दिला होता असे त्याने फालतुगिरी या पुस्तकाच्या लाँचच्यावेळी सांगितले.
ज्येष्ठ पत्रकार जान्हवी सामंत यांनी लिहिलेल्या फालतुगिरी या पुस्तकाचे अनावरण नुकतेच प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या हस्ते करण्यात आले. ऐंशीच्या दशकातील बालपण कसे होते यावर आधारित असलेले हे हलके फुलके पुस्तक असून या पुस्तकाच्या लाँचला अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, डॉक्युमेंट्री फिल्ममेकर परोमिता वोहरा आणि संगीतकार अनू मलिक यांनी हजेरी लावली होती.
अनू बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत असताना रोहित शेट्टीच्या वडिलांनी काम कशाप्रकारे मिळवायचे याविषयी त्याला टिप्स दिल्या होत्या असे अनूने आवर्जून या कार्यक्रमात सांगितले. तो म्हणाला, रोहितचे वडील म्हणजेच शेट्टीसरांनी मला एक शिकवण दिली होती की, चित्रपटसृष्टीतील लोक तुम्ही कोणत्या वाहनाने येतात त्यावरून तुमची आर्थिक परिस्थिती लोक ओळखतात आणि तशीच तुम्हाला इंडस्ट्रीत वागणूक दिली जाते. त्यामुळे गाण्याच्या रेकॉर्डिंसाठी स्टुडिओमध्ये येताना रिक्षाने न येता टॅक्सीने येत जा असे त्यांनी मला सांगितले होते. त्यावेळी टॅक्सीचे पैसे माझ्याकडे नसायचे. मग मी स्टुडिओच्या अगदी जवळपर्यंत रिक्षाने जायचो आणि पुढे टॅक्सीने आत स्टुडिओत जायचो. तिथले दरबारीदेखील मी टॅक्सीमधून येत आहे हे पाहाताच टॅक्सीचा दरवाजा उघडायचे आणि मला कुठे जायचे आहे याची आपुलकीने चौकशी करायचे.
अनू या कार्यक्रमात खूपच चांगल्या मूडमध्ये दिसला. त्याने जुली जुली हे ऐंशीतील प्रसिद्ध गाणे गात अनूने या कार्यक्रमाची सांगता केली.
जान्हवी सामंत यांचे फालतुगिरी हे इंटरेस्टिंग पुस्तक विकत घेण्यासाठी http://bit.ly/faaltugiri_amazon या लिंकवर क्लिक करा.