ऑस्कर विजेत्या 'स्लमडॉग मिलियनेयर' फेम अभिनेत्रीवर कोसळला दुःखाचा डोंगर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 1, 2020 11:52 AM2020-02-01T11:52:56+5:302020-02-01T11:53:24+5:30
'स्लमडॉग मिलियनेयर' या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्रीवर कोसळला आहे दुःखाचा डोंगर
'स्लमडॉग मिलियनेयर' या ऑस्कर पुरस्कार विजेत्या चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री रुबीना अलीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकतेच तिच्या वडिलांचे निधन झाले आहे. ३० जानेवारीला रुबीनाचे वडील रफीर कुरैशी यांची प्राणज्योत मालवली. रफीक कुरैशी गेल्या काही दिवसांपासून ट्युबर्क्युलसिस या आजाराने त्रस्त होते. त्यांच्या पार्थिवावर वांद्रे या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रुबीना आपल्या आईसोबत नालासोपारा याठिकाणी वास्तव्यास आहे तर तिचे वडील त्यांची दुसरी पत्नी आणि ५ मुलांसोबत वांद्रे येथे राहत होते.१० वर्षांची असताना रुबीनाला 'स्लमडॉग मिलियनेयर'मध्ये काम करण्याची संधी मिळाली होती. तिने या चित्रपटात छोट्या लतिकाचे काम केले होते. जय हो ट्रस्टने दिलेले रॉयल कोर्ट बिल्डिंगमधील घर सोडून ती सध्या नालासोपाऱ्यात राहत आहे.
रूबीना सध्या बीएचं शिक्षण घेते आहे. तिला बॉलिवूडमध्ये काम करायचं आहे. मात्र सध्या ती फॅशन डिझाइनचे शिक्षणही घेते आहे. याशिवाय ती एका मेकअप स्टुडिओमध्ये पार्ट टाइम नोकरी करत आहे.
२००८ साली प्रदर्शित झालेल्या 'स्लमडॉग मिलियनेयर' या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविली होती. या चित्रपटाने ८ अकादमी पुरस्कार मिळवले होते. तर ए. आर रेहमान यांनी या चित्रपटासाठी बेस्ट ओरिजनल स्कोरचा पुरस्कार आणि 'जय हो' या त्यांच्या गाण्याने सर्वोत्कृष्ट गाण्याचा पुरस्कार जिंकला होता.