Runway 34 Movie Review: मृत्यूच्या रनवेवरील रोमांचक अनुभव, जाणून घ्या कसा आहे अजय देवगणचा 'रनवे ३४'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 10:51 AM2022-04-29T10:51:30+5:302022-04-29T10:53:22+5:30
Runway 34 Movie Review: मृत्यूच्या रनवेवर जगण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यानंतर वैमानिकाला कराव्या लागणाऱ्या वेगळ्या युद्धाची गाथा 'रनवे ३४' चित्रपटात दिग्दर्शक अजय देवगणनं सादर केली आहे.
कलाकार : अजय देवगण, अमिताभ ब्च्चन, रकुल प्रित सिंग, बोमण ईराणी, अंगीरा धर, आकांक्षा सिंग, अजेय नगर
निर्माता-दिग्दर्शक : अजय देवगण
कालावधी : २ तास ४८ मिनिटे
दर्जा : साडे तीन स्टार
चित्रपट परीक्षण : संजय घावरे
विमान दुर्घटनांमध्ये फार कमी वेळा प्रवाशांचा जीव वाचतो. त्यानंतर प्रवाशांचा जीव वाचवणाऱ्या पायलटच्या कार्यकुशलतेचं कौतुक होतं, पण पडद्यामागे सुरू असलेलं नाट्य काहीतरी वेगळंच असतं. मृत्यूच्या रनवेवर जगण्यासाठी केलेला संघर्ष आणि त्यानंतर वैमानिकाला कराव्या लागणाऱ्या वेगळ्या युद्धाची गाथा या चित्रपटात दिग्दर्शक अजय देवगण(Ajay Devgan)नं सादर केली आहे. 'यु मी और हम' आणि 'शिवाय' या चित्रपटांच्या अपयशानंतर 'रनवे ३४' (Runway 34) मध्ये दिग्दर्शक म्हणून अजयची दिग्दर्शकीय कामगिरी खूपच सुधारल्याचं हा चित्रपट पाहिल्यावर जाणवलं.
कर्तव्याबाबत प्रामाणिक असणारा वैमानिक कॅप्टन विक्रांत खन्ना १५० प्रवाशांना विमानानं घेऊन सहवैमानिक तान्यासोबत दुबईहून कोचीनला निघतो. कोचिनला पोहोचल्यावर वादळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे दोनदा लँड करण्याचा प्रयत्न करतो, पण तो यशस्वी होत नाही. कोचिनच्या हवाई यंत्रणेनं दिलेल्या सूचनांनुसार लँड करण्यासाठी त्रिवेंद्रमला जातो, पण तोपर्यंत वादळ वेगानं त्रिवेंद्रमच्या दिशेनं सरकलेलं असतं. तिथं एकदा लँड करण्याचा प्रयत्न फसल्यानंतर विक्रांत रनवे ३४ वर विमान लँड करण्याचा निर्णय घेतो. काहीही दिसत नसताना प्रचंड आत्मविश्वास आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून तो विमान लँड करण्यात यशस्वीही होतो, पण त्यानंतर त्याच्यासोबत जे घडतं ते नाट्य या चित्रपटात आहे.
'का' आणि 'कसे' या दोन प्रश्नांमध्ये दडलेल्या सत्याची कहाणी या चित्रपटात आहे. चित्रपटाचा विषय चांगला असून, रोमांचक सादरीकरण थरार वाढवण्याचं काम करतं. पटकथेला संवादलेखनाची अचूक साथ लाभली आहे. चित्रपट सुरू झाल्यापासून कथानक वेगात पुढे सरकतं. त्यामुळे पुढे काय घडणार याबाबत उत्सुकता वाढते. पहिल्या भागात नायकाची पार्श्वभूमी, प्रवासाला निघण्यापूर्वीचा दिनक्रम आणि वादळात सापडलेल्या विमानाला धोकादायक परिस्थितीत सुखरूप रनवेवर लँड करण्याचा वैमानिकाने गाजवेला पराक्रम आहे. दुसऱ्या भागाचं कथानक त्याने घेतलेला निर्णय, त्याची वागणूक आणि विमान चालवताना केलेल्या कृतींवर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्याची झाडाझडती घेणारं आहे. चित्रपटाचे दोन्ही भाग उत्कंठावर्धक असले, तरी दुसरा भाग आणखी थोडा वेगवान करता आला असता. अवकाश आणि रनवेवरील थरार चांगलाच रंगवला आहे. कोर्ट रुम ड्रामाही उत्सुकतावर्धक आहे. सत्य घटनेवर आधारलेल्या या चित्रपटात गाण्याची आवश्यकता नव्हती. लहान-सहान गोष्टींमधून नायकाची गुणवैशिष्ट्ये मोठ्या शिताफीनं सादर करण्यात आली आहेत. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट चांगला आहे.
अजय देवगणनं साकारलेला वैमानिक सुरुवातीला थोडा अॅरोगंट वाटतो, पण तो तसा नाही. कामाप्रती असलेला प्रमाणिकपणा आणि लाभलेल्या अद्भुत शक्तीचा वापर कर्तव्य बजावताना करण्याचा त्याचा स्वभाव मनाला भावतो. कुठेही ओव्हर कॅान्फिडन्ट न होता अजयनं हे कॅरेक्टर साकारलं आहे. मध्यंतरानंतर येऊनही अमिताभ बच्चन यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेचा दबदबा जाणवतो. लहान-सहान कृतीतून अमिताभ यांनी सादर केलेला शिस्तप्रिय इन्व्हेस्टिगेटींग ऑफिसर स्मरणात राहण्याजोगा आहे. रकुल प्रित सिंगनं साकारलेली को-पायलट तिच्या आजवरच्या व्यक्तिरेखांपेक्षा खूपच वेगळी आहे. बोमण ईराणी, अंगीरा धर, आकांक्षा सिंग, अजेय नगर यांच्या छोट्या व्यक्तिरेखाही प्रभावी आहेत. संकटसमयी प्राणांची बाजी लावणाऱ्या नायकांना विजयानंतरही कोणत्या परिस्थितीला सामोरं जावं लागतं याचं वास्तववादी चित्र दाखवणारा हा चित्रपट एकदा तरी पहायला हवा.