Birthday Special : ‘शोले’साठी सचिन पिळगावकर यांना मानधन नाही तर मिळाली होती ही वस्तू
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2019 08:00 AM2019-08-17T08:00:00+5:302019-08-17T08:00:01+5:30
सिनेसृष्टीत अनेक नावांना ओळखीची गरज नाही. असेच एक नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरची आपली छाप सोडणा-या या अभिनेत्याचा आज वाढदिवस.
सिनेसृष्टीत अनेक नावांना ओळखीची गरज नाही. असेच एक नाव म्हणजे अभिनेता सचिन पिळगावकर यांचे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटसृष्टीवरची आपली छाप सोडणा-या या अभिनेत्याचा आज वाढदिवस. सचिन यांनी केवळ अभिनयच केला नाही तर दिग्दर्शक, निर्माता, सूत्रसंचालक अशा क्षेत्रावरही आपली छाप सोडली.
उण्यापु-या वयाच्या चौथ्या वर्षी ‘हा माझा मार्ग एकला’ या चित्रपटातून त्यांनी बालकलाकार म्हणून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि यांतर तब्बल 65 चित्रपटांत बालकलाकार म्हणून काम केले.
मराठी चित्रपटसृष्टीत सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार त्यांना मिळाला. 1966 मध्ये ‘झिंबो का बेटा’ या चित्रपटातून त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळाला. अनेक हिंदी चित्रपटांत त्यांनी लहान लहान भूमिका साकारल्या. ‘शोले’ या हिंदीतील सुपरडुपर हिट चित्रपटातही त्यांची एक भूमिका होती.
‘शोले’मध्ये त्यांनी साकारलेली अहमदची भूमिका डोळ्यांत भरणारी होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल पण या भूमिकेसाठी फी म्हणून सचिन यांना एक फ्रिज दिला गेला होता.
वयात आल्यावर हिंदी चित्रपटांनीच त्यांना ‘नायक’ केले. गीत गाता चल यात त्यांनी प्रमुख नायकाची भूमिका साकारली. बालिका वधू, नदीया के पार, अंखियों के झरोखे से या चित्रपटात त्यांनी आपल्यातील सशक्त अभिनेत्याचे दर्शन घडवले.
वडीलांची निर्मिती असलेल्या ‘मायबाप’ या मराठी चित्रपटापासून सचिन यांनी दिग्दर्शनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, स्वत: दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांमध्ये स्वत: अभिनय करण्याची नवी पद्धत त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत रूढ केली.
सचिन ‘नवरी मिळे नव-याला’ या चित्रपटाच्या सेटवर सुप्रिया यांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी लग्न केले. सचिन यांनी सुप्रिया यांना लग्नाची मागणी घातल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच दोघांचे लग्न झाले होते. लग्नाच्या आदल्या रात्री सचिन यांच्या मित्रांनी त्यांच्यासाठी बॅचलर पार्टी ठेवली होती. या बॅचलर पार्टीमुळे दुस-या दिवशी सचिनजी लग्नात तब्बल तीन तास उशीरा पोहोचले होते. त्यामुळे सुप्रिया त्यांच्यावर चिडल्या होत्या आणि एक शब्दही त्यांच्यासोबत बोलल्या नव्हत्या.