अहो, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात...; सचिन यांनी उर्दूत दिल्या जन्माष्टमीच्या शुभेच्छा, नेटकऱ्यांनी घेतली 'शाळा'
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 03:31 PM2021-08-31T15:31:09+5:302021-08-31T15:31:49+5:30
सचिन यांनी फेसबुकवरून जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्यात. पण त्यांच्या शुभेच्छा चाहत्यांना फार रूचल्या नाहीत...
सोमवारी देशभर श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सोहळा उत्साहात साजरा झाला. बॉलिवूडच्या आणि मराठी चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींनी या प्रसंगी चाहत्यांना भरभरून शुभेच्छा दिल्यात. ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर हेही त्यापैकीच एक. सचिन यांनी फेसबुकवरून शुभेच्छा दिल्यात. पण त्यांच्या शुभेच्छा चाहत्यांना फार रूचल्या नाहीत आणि मग काय, लोकांनी त्यांना ट्रोल करायला सुरूवात केली.
फेसबुकवर कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा देताना सचिन यांनी एक उर्दू शेर शेअर केला. ‘अगर किशन की तालीम आम हो जाए, तो काम फितनागरों का तमाम हो जाए...,’ हा मौलाना जफर अली खान यांनी शेअर केला. सोबत जन्माष्टमी मुबारक हो.., असेही लिहिले.
ही पोस्ट पाहून अनेकांनी सचिन यांना लक्ष्य केले. गोकुळाष्टमीसारख्या सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठी, हिंदी, संस्कृत असे पर्याय उपलब्ध असताना उर्दूचाच आग्रह का? अशा आशयाचा सवाल अनेकांनी पिळगावकर यांना विचारला.
पिळगावकर, भगवद्गीतेत 600 पेक्षा अधिक श्लोक आहेत. तुम्ही ‘कट्यार’मध्ये मुस्लिम गायकाची भुमिका केलीत, त्या भुमिकेतून बाहेर या आणि कुणाचेही दाखले देऊ नका, अशी कमेंट एका फेसबुक युजरने केली. श्रीकृष्णाने अख्खी गीता संस्कृतमध्ये सांगितली, त्याच श्रीकृष्णाच्या जन्म तिथीच्या शुभेच्छा उर्दू भाषेत दे आहात? काही विचार करून तरी शुभेच्छा द्यायच्या, असे एका युजरने लिहिले. तुमच्याकडून हीच नकली धर्मनिरपेक्षता अपेक्षित होती, अशा शब्दांत एका युजरने सचिन यांना ट्रोल केले. अहो सचिन, तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आलात, मराठीचा वापर करा, असा सल्ला एकाने त्यांना दिला. कट्यार नक्की काळजात घुसली की मेंदूत, अशी कमेंट एकाने केली.