गणेश गायतोंडे परत येणार? ‘सेक्रेड गेम्स 3’बद्दल नवाजुद्दीन सिद्दीकीने केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2021 01:32 PM2021-01-05T13:32:35+5:302021-01-05T13:33:23+5:30
तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिस-या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे
‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सच्या पहिल्या ओरिजनल वेबसीरिजचे पहिले सीजन तुफान गाजले. इतके की, पहिल्या सीझननंतर याचा दुसरा सीझन कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले होते. अखेर दुसरा सीझनही आला आणि लोकांनी तो डोक्यावर घेतला. आता प्रतीक्षा आहे की, या लोकप्रिय वेबसीरिजच्या तिस-या सीझनची. तुम्हीही ‘सेक्रेड गेम्स’च्या तिस-या सीझनची प्रतीक्षा करत असाल तर ही बातमी तुमची निराशा करणारी आहे. होय, ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा सीझन बनणार नसल्याचा खुलासा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीने केला आहे.
‘सेक्रेड गेम्स’मध्ये नवाजुद्दीनने गणेश गायतोंडेची व्यक्तिरेखा साकारली होती. त्याची ही भूमिका प्रचंड गाजली होती. याच नवाजुद्दीनने ‘स्पॉटबॉय’ला दिलेल्या मुलाखतीत ‘सेक्रेड गेम्स’चा तिसरा पार्ट बनणार नसल्याची माहिती दिली.
‘सेक्रेड गेम्सला जगभरात प्रेम मिळाले. मला आठवते मी रोममध्ये तनिष्ठा चॅटर्जीसोबत एका सिनेमाचे शूटींग करत होतो, तिथेही सगळे याच वेबसीरिजची चर्चा करत होते. तेव्हाच या वेबसीरिजचा दुसरा पार्ट बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. दुस-या सीझनला पहिल्या सीझन इतके प्रेम मिळाले नाही. कदाचित सेक्रेड गेम्स-2 करण्यामागचा हेतू पहिल्या सीझन इतका प्रामाणिक नव्हता. राहिली गोष्ट या वेबसीरिजच्या तिस-या पार्टची तर त्याची शक्यता नाही. कारण मूळ कादंबरीतील कथा सेक्रेड गेम्सच्या दोन्ही सीझनमध्ये दाखवण्यात आली आहे. विक्रम चंद्रांच्या कादंबरीत आता असेच काहीच उरले नाही, जे आम्ही तिस-या सीझनमध्ये दाखवू शकू,’ असे नवाजने यावेळी सांगितले.
हे माझे श्रेय नाही...
‘सेक्रेड गेम्स’मधील गणेश गायतोंडेची भूमिका खूप गाजली. विशेषत: त्याचे संवाद लोकप्रिय झालेत. मला याचे श्रेय घ्यायचे नाही. डायलॉग्सच्या यशाचे श्रेय मी घेऊ शकत नाही. हे श्रेय संवाद लिहिणा-या लेखकाचे आहे. यश चोप्रा यांच्या ‘दीवार’मध्ये ‘मेरे पास माँ है,’ असा शशी कपूर यांच्या तोंडी एक डायलॉग होता. पण ही लाईन सलीम-जावेदने लिहिली होती. त्यामुळे त्याचे श्रेय त्यांनाच मिळायला हवे, असेही नवाज म्हणाला.