करीना-करिश्माची मावशी होती ही लोकप्रिय अभिनेत्री, रिअल लाइफमध्ये मात्र हलाखीचं जीणं जगत होती.
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2020 06:57 PM2020-09-10T18:57:31+5:302020-09-10T19:02:41+5:30
रूपेरी पडद्यावर रसिकांच्या मनावर राज्य करणारी साधना रिअल लाइफमध्ये मात्र हलाखीचं जीणं जगत होत्या.
कोणतंही क्षेत्र असो त्यात स्ट्रगल कुणालाही चुकला नाही. मात्र अशा आव्हानात्मक परिस्थितीतही मेहनतीच्या जोरावर अनेक कलाकार सुपरस्टारपदावर पोहचले आहेत. रसिकांच्या गळ्यातील ते ताईत बनले आहेत. करिअरच्या ऐन भरात असताना या कलाकारांना रसिकांचं प्रेम, अमाप लोकप्रियता आणि बक्कळ पैसाही मिळतो. मात्र याच चित्रपटसृष्टीची जशी चांगली बाजू तशी दुसरी बाजूही आहे. कारण इथं उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे.
करिअर ऐन भरात असताना सेलिब्रिटींचं कौतुक होतं,प्रेम मिळतं. मात्र कालांतराने याच कलाकारांच्या पडत्या काळात कुणीच त्यांच्याकडे लक्षही देत नाही. अशी कित्येक उदाहरणं चित्रपटसृष्टीत आहेत ज्यांच्याकडे आपल्याच माणसांनी दुर्लक्ष केले आहे.60 आणि 70 च्या दशकात साधना या ‘लव्ह इन शिमला’ चित्रपटाने एका रात्रीत स्टार बनल्या . त्याच चित्रपटामध्ये साधनाची हेअरस्टाइलही त्यांच्या नावामुळेच पुढे जास्त प्रसिद्ध झाली.
60 ते 70 च्या दशकात जवळपास 35 हिट सिनेमांमध्ये काम केले होते.यात ‘वो कौन थी’, ‘मेरा साया’, ‘गीता मेरा नाम’, ‘दिल दौलत दुनिया’, ‘दुल्हा दुल्हन’, ‘हम दोनो’ या सिनेमांचा समावेश आहे. ‘गीता मेरा नाम’ या सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शनही केले होते. ‘झुमका गिरा रे बरेली के बाजार में’, ‘आजा आई बहार दिल है बेकरार’, ‘लग जा गले के फिर ये हसी रात हो न हो’ यांसारखी हिट गाणी त्यांच्यावर चित्रीत करण्यात आली होती.
साधनाचे कपूर कुटुंबियांशी घरच्यासारखे संबंध होते. साधनाचे वडील आणि अभिनेत्री बबिताचे वडील हरी शिवदासानी सख्खे भाऊ होते. अशाप्रकारे, बबिता आणि साधना चुलतबहिणी आहेत. साधना बबीताच्या मुली करीना आणि करिश्माची चुलत मावशी लागते. रूपेरी पडद्यावर रसिकांच्या मनावर राज्य करणारी साधना रिअल लाइफमध्ये मात्र हलाखीचं जीणं जगत होत्या.
1955 मध्ये फिल्म 'श्री 420' साधनाला पहिला ब्रेक मिळाला. या चित्रपटानंतर साधनाने ब-याच चित्रपटात काम केले. साधनाने 'लव्ह इन शिमला' चे दिग्दर्शक राम कृष्ण नय्यर यांच्याशी लग्न केले. चित्रपटाच्या सेटवर दोघांची भेट झाली होती.दोघांची मैत्री झाली आणि त्यानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या वेळी साधना या फक्त 16 वर्षांच्या होत्या आणि नय्यर 22 वर्षांचे होते. साधनाचे कुटुंबीय लग्नासाठी तयार नव्हते पण राज कपूरच्या मदतीने दोघांचे लग्न पार पडले. लग्नानंतर साधना चित्रपटांपासून दूर गेल्या.मात्र फिल्म इंडस्ट्री सोडल्यानंतर साधनाची प्रकृती खालावत गेली. हा काळ त्यांच्यासाठी ख-या अर्थाने संघर्षाचा ठरला.
साधना यांचे पती नय्यर यांचे 1995 मध्ये निधन झाले. त्या दोघांनाही मूलबाळ नव्हते. पतीच्या निधनानंतर साधना एककाकी पडल्या सतत आजारीही असायच्या. थायरॉईड आजाराने साधना त्रस्त होत्या. ज्यामुळे त्यांनी खूप त्रास झाला.आजारपणामुळे, त्यांना डोळ्यांचाही त्रास होवू लागला. ज्यामुळे त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात भाग घेणे बंद केले होते.
अखेरच्या काळात त्यांनी फिल्म इंडस्ट्रीतील लोकांकडे मदतही मागितली पण कोणीही त्यांच्या मदतीला पुढे आले नाही. साधनाची जवळची मैत्रीण आणि ज्येष्ठ अभिनेत्री तबस्सुमनेच या गोष्टीचा खुलासा केला होता. अखेरच्या दिवसांत साधना मुंबईतील एका जुन्या बंगल्यात एकट्याच राहत होत्या. हा बंगला आशा भोसले यांचा होता. 25 डिसेंबर 2015 रोजी साधनाने या जगाचा निरोप घेतला.