सैफ अली खान विचारतोय, 'केम छो, मजा मां'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 03:33 PM2018-09-29T15:33:39+5:302018-09-29T15:37:47+5:30
'बाजार' सिनेमातील 'केम छो, मजा मां' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे गुजराती रॅप साँग असून हे गाणे रसिकांना आवडते आहे.
बॉलिवूडचा नवाब म्हणजेच अभिनेता सैफ अली खान 'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमध्ये सरताज सिंग या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहायला मिळाला. ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. तसेच यातील सैफचा अभिनय रसिकांना चांगलाच भावला. आता त्याचा आगामी चित्रपट 'बाजार' लवकरच प्रदर्शित होणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता.
आता या सिनेमातील 'केम छो, मजा मां' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे गुजराती रॅप साँग असून हे गाणे रसिकांना आवडते आहे. हे गाणे तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे आणि शब्बीर अहमद व इक्का यांच्या लेखणीतून हे गाणे शब्दबद्ध झाले आहे. या गाण्याला इक्का सोबत ज्योतिका टंगरीने स्वरसाज दिला आहे.
'बाजार' हा चित्रपट शेअर मार्केटवर आधारित असून बिझनेस, त्यातील नफा-तोटा, आर्थिक व्यवहार आणि या सर्व गोष्टींच्या अवतीभोवती फिरणारी गुन्हेगारी यावर आधारीत 'बाजार' असल्याचे ट्रेलर वरुन दिसते. यात मराठमोळी राधिका आपटे आणि चित्रांगदा यांचीदेखील महत्त्वाची भूमिका आहे. या चित्रपटात सैफ शकुन कोठारी नामक शेअर ब्रोकरची व्यक्तीरेखा साकारणार आहे. तो केवळ पैसा कमावण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या एका स्वार्थी व्यावसायिक असतो. शकुन कोठारीची पत्नी मंदिरा कोठारीची भुमिका चित्रांगदा सिंगने निभावली आहे. या चित्रपटातून रोहन मेहरा हा नवा चेहराही बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. ‘सेर्केड गेम्स’नंतर राधिका आणि सैफ पुन्हा एकदा या चित्रटाच्या निमित्ताने एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गौरव चावला यांनी केले असून येत्या २६ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित केला जाईल.
'बाजार' सिनेमाचा ट्रेलर पाहिल्यानंतर या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता वाढली आहे.