Saif Ali Khan : सैफ अली खानला धोबीपछाड; रिक्षात बसताच आली चोरीची आयडिया, आरोपीचे धक्कादायक खुलासे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 12:43 IST2025-01-20T12:42:27+5:302025-01-20T12:43:10+5:30
Saif Ali Khan : सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल शहजादबद्दल आतापर्यंत झालेले सर्व खुलासे धक्कादायक आहेत.

Saif Ali Khan : सैफ अली खानला धोबीपछाड; रिक्षात बसताच आली चोरीची आयडिया, आरोपीचे धक्कादायक खुलासे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या हल्ल्यातील आरोपीला मुंबई पोलिसांनी रविवारी ठाण्यातून अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी बांगलादेशी आहे आणि ही घटना घडवून आणल्यानंतर तो पळून जाण्याच्या तयारीत होता. आता या प्रकरणात अनेक खुलासे होत आहेत. आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा कुस्ती खेळत असल्याचा सर्वात मोठा खुलासा आता समोर आला आहे.
सैफ अली खान हल्ला प्रकरणात अटक करण्यात आलेल्या बांगलादेशी नागरिक मोहम्मद शरीफुल शहजादबद्दल आतापर्यंत झालेले सर्व खुलासे धक्कादायक आहेत. आता चौकशीदरम्यान असं उघड झालं आहे की, आरोपी बांगलादेशमध्ये कुस्ती खेळायचा. त्याला लहानपणापासूनच कुस्तीची आवड होती. मोहम्मद शरीफुलने स्थानिक पातळीवर काही कुस्ती स्पर्धांमध्येही भाग घेतला. यामुळेच आरोपी शहजादचे शरीरयष्टी आणि शारीरिक स्थिती पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
सैफला केलं धोबीपछाड
संभाषणातून असं दिसून आलं की, जेव्हा आरोपी सैफची मोलकरीण लिमावर हल्ला करत होता, तेव्हा सैफ अली खानने त्याला घट्ट पकडलं होतं. पण त्याने कुस्तीच्या चालीने (धोबी पछाड) स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवलं आणि संधी मिळताच त्याने सैफवर चाकूने हल्ला केला. सैफच्या पाठीवर आणि मानेवर चाकूंनी वार केले.
असा बनवला चोरीचा प्लॅन
चौकशीदरम्यान, आरोपीने पोलिसांना सांगितलं की, काही दिवसांपूर्वी तो रिक्षाने प्रवास करत होता आणि प्रवासादरम्यान त्याला रिक्षा चालकाकडून कळलं की वांद्रे परिसरात अनेक मोठे उद्योगपती आणि श्रीमंत लोक राहतात. त्याच दिवशी आरोपीने चोरी करण्याचा प्लॅन केला.
सैफ अली खानचं घर का निवडलं?
सैफ अली खानच्या इमारतीत चोरीची योजना आखली कारण त्याला खाली एक लॉन दिसत होतं. त्यामुळे इमारतीवर चढताना तो खाली पडला तरी त्याला दुखापत होणार नाही. आता पोलीस तपास करत आहेत की, आरोपी मोहम्मद शरीफुल शहजादने सैफ अली खानच्या घरात एन्ट्री करण्यापूर्वी इतर काही सेलिब्रिटींच्या घरांची रेकी केली होती का? आरोपी १ कोटी रुपये चोरण्याच्या उद्देशाने गेला होता आणि हे पैसे घेऊन बांगलादेशला जाण्याच्या तयारीत होता. सैफच्या मोलकरणीनेही आरोपीने १ कोटी रुपयांची मागणी केल्याचा उल्लेख केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजादला ठाण्यातील कासारवडवली येथील हिरानंदानी इस्टेटजवळ अटक करण्यात आली, मुंबई पोलिसांची ३० हून अधिक पथकं आरोपीला पकडण्यासाठी काम करत होती. आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस पथकं दिवसरात्र काम करत होती. अखेर पोलिसांनी रविवारी आरोपीला अटक केली.