Saif Ali Khan attacked: एनकाऊंन्टर स्पेशलिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी दाखल, हल्ल्याचा छडा लावणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:21 IST2025-01-16T11:21:14+5:302025-01-16T11:21:26+5:30
सैफवर हल्ला करणारा चोर १२ व्या मजल्यावर घुसलाच कसा?

Saif Ali Khan attacked: एनकाऊंन्टर स्पेशलिस्ट दया नायक सैफ अली खानच्या घरी दाखल, हल्ल्याचा छडा लावणार
अभिनेता सैफ अली खानच्या (Saif Ali Khan) बांद्रा येथील घरी रात्री २ वाजता त्याच्यावर हल्ला झाला. चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञाताने सैफवर चाकूने ६ वेळा वार केले. यानंतर तो तिथून पळून गेला. सैफला तातडीने लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर नुकतीच सर्जरीही करण्यात आली आहे. डॉक्टरांकडून त्याच्या तब्येतीविषयी अपडेट्स येण्याची प्रतीक्षा आहे.
दरम्यान सैफ अली खानच्या घरी तपासासाठी मुंबई क्राइम ब्रांचची टीम दाखल झाली आहे. एन्काऊंटर स्पेशलिस्ट आणि क्राइम ब्रांचचे अधिकारी दया नायक सैफच्या घराखाली टीमसोबत दिसले. सैफ अली खान कुटुंबासह १२ व्या मजल्यावर राहतो. कडक सुरक्षाव्यवस्था असताना चोर नेमका घुसलाच कसा याचा तपास आता दया नायक आणि टीम करत आहे. तसंच चोर फरार असल्याने त्याचा शोधही घेतला जात आहे. विशेष म्हणजे सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुठेच चोर दिसत नाही त्यामुळे तो नक्की वरपर्यंत कसा गेला की तो बिल्डिंगमधलाच कोणी होता असेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. दया नायक यांचा सैफच्या घराखालचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
६ वेळा केला हल्ला
सैफ अली खान बांद्रा येथील 'सतगुरु शरण' या उच्च्भ्रू सोसायटीत राहतो. सूत्रांनी दावा केला आहे की, सैफ अली खानवर धारदार शस्त्राने सहा वेळा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात त्याच्या मानेवर, डाव्या मनगटावर, छातीवर जखमा झाल्या. एवढंच नाही तर मणक्यालाही दुखापत झाल्याचं म्हटलं जात आहे. पाठीच्या कण्याला दुखापत झाल्यामुळे ऑपरेशन आवश्यक असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.