सैफवर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याच्या घराबाहेरील व्हिडिओ आला समोर, करीनासोबत दिसणारे 'ते' तीन जण कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 11:59 IST2025-01-16T11:58:44+5:302025-01-16T11:59:06+5:30
Saif Ali Khan Attack : सैफ अली खानवर हल्ल्या झाल्यानंतर त्याच्या घराबाहेरील रात्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.

सैफवर हल्ला झाल्यानंतर अभिनेत्याच्या घराबाहेरील व्हिडिओ आला समोर, करीनासोबत दिसणारे 'ते' तीन जण कोण?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर बुधवारी(१५ जानेवारी) रात्री चाकूने जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सैफच्या मानेला आणि हाताला दुखापत झाली आहे. सैफ अली खानवर हल्ल्या झाल्यानंतर त्याच्या घराबाहेरील रात्रीचा एक व्हिडिओ समोर आला आहे.
विरल भय्यानी या पापाराझी इन्स्टाग्राम पेजवरुन एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. सैफवर हल्ल्या झाल्यानंतर रात्री त्याच्या घराबाहेरील हा व्हिडिओ असल्याचं म्हटलं गेलं आहे. या व्हिडिओत करीना कपूर घरातील कर्मचाऱ्यांसोबत बोलताना दिसत आहे. करिना कर्मचाऱ्यांना विचारपूस करून त्यांच्याकडून माहिती घेत असल्याचं व्हिडिओत दिसत आहे.
नेमकं काय घडलं?
हल्लेखोराने सैफ अली खानच्या घरात मागच्या बाजूने प्रवेश केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. सैफच्या घरामध्ये काम करणाऱ्या मदतनीसला भेटण्यासाठी हल्लेखोर घरात आल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सैफवर हल्ला करण्याअगोदर हल्लेखोर सैफ-करीनाचा मुलगा तैमुरच्या खोलीकडे जात होता. हल्लेखोराला तैमुरच्या खोलीच्या दिशेने जाताना सैफच्या घरातील मोलकरणीने पाहिलं आणि आरडाओरडा सुरू केला. मोलकरणीने आरडाओरडा केल्यानंतर बाजूच्याच खोलीत झोपलेला सैफ अली खान जागा झाला आणि बाहेर आला. सैफने हल्लेखोर आणि मोरकणीला पाहिलं आणि हल्लेखोरला रोखण्यासाठी तो धावला. या झटापटीत हल्लेखोराने सैफवर चाकूने ६ वार केले. यात सैफ गंभीर जखमी झाला आहे.