Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:00 IST2025-01-31T13:00:23+5:302025-01-31T13:00:42+5:30
Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे.

Saif Ali Khan : सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी शरीफुलचा चेहरा CCTV फुटेजशी झाला मॅच
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लामचा चेहरा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओशी मॅच झाला आहे. एफएसएल अधिकाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपीचा चेहऱ्याची ओळख पटवली आहे.
सूत्रांचे म्हणणं आहे की, आरोपी शरीफुलचा चेहरा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झालेल्या व्यक्तीशी जुळला आहे. यापूर्वी, हल्ल्याचा आरोपी मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद हा बांगलादेशी असल्याचे पुरावे सापडले होते. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला त्याचे बांगलादेशी ओळखपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स सापडले होते. त्यात त्याचं नाव शरीफुल इस्लाम असं लिहिलं आहे. वडिलांचं नाव मोहम्मद रुहुल अमीन आहे.
मुंबई पोलिसांनी गेल्या रविवारी बांगलादेशी शरीफुल इस्लाम शहजादला अटक केली होती. आरोपी विजय दास या नावाने मुंबईत बेकायदेशीरपणे राहत होता. तो बांगलादेशातील बरिसाल शहरातील रहिवासी आहे. गेल्या पाच महिन्यांपासून मुंबईत राहत होतो. तो एका हाऊसकीपिंग एजन्सीमध्ये छोटी-छोटी कामं करत होता. सात महिन्यांपूर्वी दावकी नदी बेकायदेशीरपणे ओलांडून भारतात आला होता. काही आठवडे पश्चिम बंगालमध्ये राहिल्यानंतर, नोकरीच्या शोधात मुंबईत आला.
आरोपीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी सांगितलं होतं की, तो सैफ अली खानच्या वांद्रे येथील फ्लॅटमध्ये प्रवेश करण्यासाठी सतगुरु शरण इमारतीची भिंत चढून गेला होता. तो तिथे पोहोचला तेव्हा सुरक्षा रक्षक झोपले होते. तो मुख्य प्रवेशद्वारातून इमारतीत शिरला जिथे सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले नव्हते. आवाज होऊ नये म्हणून त्याने त्याचे बूट काढले, बॅगेत ठेवले आणि त्याचा फोनही बंद केला.
१६ जानेवारीच्या रात्री आरोपीने सैफ अली खानच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला. सैफवर चाकूने ६ वेळा चाकूने वार करण्यात आले होते. सैफला ताबडतोब लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. आता अभिनेत्याची प्रकृती बरी असल्याचं सांगण्यात येत आहे.