घटस्फोटानंतर सैफ अली खानने अमृता सिंगवर केला होता हा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:00 AM2020-04-16T06:00:00+5:302020-04-16T06:00:02+5:30
सैफने एका मुलाखतीत अमृतावर हा गंभीर आरोप केला होता.
अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंग यांनी आपल्या घटस्फोटावर नेहमीच मौन बाळगलं आहे. त्यांच्या घटस्फोटाला आता अनेक वर्षं झाली आहेत. घटस्फोटानंतर त्यांनी कधीच एकमेकांविरोधात भाष्य केलं नाही. पण सैफ अली खानने 2005 रोजी टेलिग्राफला दिलेली एक मुलाखत काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. या मुलाखतीत सैफ अली खानने आपल्या खाजगी आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते.
या मुलाखतीत अमृता सिंगबद्दल सैफने सांगितले होते की, "जेव्हा तुम्ही काहीच कामाचे नाहीत याची वारंवार जाणीव करून दिली जाते, तेव्हा खूप वाईट वाटतं. दरवेळी तुमच्या आई आणि बहिणीला शिव्या दिल्या जातात. त्यावेळी खूप त्रास होतो. माझ्या आयुष्यातील खूप मोठा काळ या वाईट परिस्थितीतून गेला आहे".
याशिवाय सैफ अली खानने घटस्फोटानंतर अमृता सिंगला दिलेल्या रकमेवरही या मुलाखतीत चर्चा केली आहे. "मला घटस्फोटानंतर अमृताला पाच कोटी रुपये द्यायचे होते, ज्यामधील अडीच कोटी मी आधीच दिले आहेत. याशिवाय जोपर्यत माझा मुलगा 18 वर्षांचा होत नाही, तोपर्यंत दर महिन्याला एक लाख रुपये द्यायचे आहेत. मी कुणी शाहरुख खान नाही आणि माझ्याकडे एवढे पैसेही नाहीत. सर्व रक्कम देण्याचं आश्वासन मी दिलं असून शेवटच्या श्वासापर्यंत देत राहिन", असं सैफने या मुलाखतीत सांगितले होते.
सैफने आपल्या या मुलाखतीत हेदेखील सांगितलं आहे की, जाहिरात, स्टेज शो आणि चित्रपटांमधून कमावलेला सर्व पैसा आपल्या मुलांवर खर्च करण्यासाठी देत आहोत. "माझ्याकडे दमडीही शिल्लक नसून माझं घरही अमृताच्या नावे आहे."
सैफचे आज करिना कपूरसोबत लग्न झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे. सैफने टेलिग्राफला ही मुलाखत दिली त्यावेळी तो रोजा या मॉडेलसोबत नात्यात होता. ते दोघे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते.