Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यामागे एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग?; फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले कपडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2025 10:26 IST2025-01-26T10:26:17+5:302025-01-26T10:26:17+5:30
Saif Ali Khan : सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र काम करत आहेत.

Saif Ali Khan : सैफवरील हल्ल्यामागे एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग?; फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवले कपडे
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान यांच्यावरील हल्ल्याच्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुंबई पोलीस दिवसरात्र काम करत आहेत. पोलिसांना आता असं वाटतं की, या घटनेत एकापेक्षा जास्त लोकांचा सहभाग असू शकतो. अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी शहजादचे काही इतर साथीदार त्याला दुसऱ्या मार्गाने मदत करत असावेत, असा संशय मुंबई पोलिसांना आहे.
या प्रकरणात एका ३० वर्षीय बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी लोकांचा सहभाग असल्याचा संशय असल्याने पोलीस अटक केलेल्या आरोपीची कसून चौकशी करत आहेत. १६ जानेवारी रोजी वांद्रे येथील अभिनेत्याच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी सैफ अली खान आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे नमुने आणि कपडे गोळा केले आणि ते तपासणीसाठी फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीमध्ये पाठवले, असं सांगितलं.
या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी १९ जानेवारी रोजी ठाण्यातून बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला अटक केली होती. शुक्रवारी न्यायालयाने शरीफुलची पोलीस कोठडी २९ जानेवारीपर्यंत वाढवली. अधिकाऱ्याने सांगितलं की, आरोपी तपास पथकाला सहकार्य करत नव्हता आणि त्याने गुन्ह्यात वापरलेला चाकू कुठून खरेदी केला हे अद्याप उघड केलेले नाही.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीच्या कपड्यांवरील रक्त अभिनेत्याचं आहे की नाही? हे तपासण्यासाठी अभिनेता आणि आरोपीच्या रक्ताचे नमुने आणि कपडे एफएसएलकडे पाठवण्यात आले आहेत. सैफ अली खानच्या अपार्टमेंटमधून गोळा केलेले बोटांचे ठसे आरोपींच्या बोटांचे ठशाशी जुळतात.
सैफ अली खानने मुंबई पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, आरोपीने त्यांच्या घरातील हाऊस हेल्पर मेडवर हल्ला केला आणि १ कोटी रुपये मागितले. जेव्हा त्याने थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा हल्लेखोराने अचानक त्याच्यावर अनेक वार केले आणि तो पळून गेला. यानंतर सैफला उपचासाठी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्याच्यावर दोन सर्जरी करण्यात आल्या.