चुकीच्या वर्तनामुळे पहिल्याच चित्रपटातून झाली होती सैफची हकालपट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 04:25 PM2021-09-13T16:25:51+5:302021-09-13T16:26:45+5:30
Saif Ali Khan : १९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाच्या माध्यमातून सैफने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र, या चित्रपटापूर्वी त्याला 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटाची ऑफर मिळाली होती.
बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान (Saif Ali Khan) त्याच्या चित्रपटांसोबतच त्याच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळेही कायम चर्चेत असतो. अनेकदा त्याच्या याच वक्तव्यांमुळे त्याला सोशल मीडियावर ट्रोलही व्हावं लागतं. विशेष म्हणजे सैफच्या याच स्वभावामुळे एकेकाळी त्याची चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली होती. हो. अनेकांना याविषयी माहित नसेल, परंतु, चुकीच्या वर्तनामुळे त्याला त्याचा पहिला चित्रपट गमवावा लागला होता.
१९९३ मध्ये 'परंपरा' या चित्रपटाच्या माध्यमातून सैफने रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं होतं. मात्र, या चित्रपटापूर्वी त्याला 'बेखुदी' (Bekhudi) या चित्रपटाची ऑफर मिळाली होती. परंतु, त्याच्या स्वभावामुळे त्याला हा चित्रपट गमवावा लागला.
पहिल्याच चित्रपटातून अशी झाली सैफची हकालपट्टी
'बेखुदी' या चित्रपटात सैफसोबत अभिनेत्री काजोल स्क्रीन शेअर करणार होती. या चित्रपटाचं पहिलं शेड्युलही तयार करण्यात आलं होतं.मात्र, सेटवर सैफच्या चुकीच्या पद्धतीने वागण्याच्या पद्धतीमुळे त्याला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सैफच्या वागणुकीला कंटाळून निर्मात्यांना त्याची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला, असं म्हटलं जातं.
सैफचं वागणं होतं अनप्रोफेशनल
सैफ अली खानचं वागणं पाहून तो अनप्रोफेशनल असल्याचं दिग्दर्शकांना वाटलं. सैफला चित्रपटाविषयी कोणताही सिरीअसनेस नाही. त्याला चित्रपटात काम करण्याची इच्छा नाही असं दिग्दर्शकांना वारंवार वाटत होतं. त्यामुळे त्याला चित्रपटातून बाहेर केलं. त्यानंतर दिग्दर्शक राहुल रवैल यांनी सैफच्या जागी अभिनेता कमल सदाना याची निवड केली.
दरम्यान, याप्रकरणी सैफने एका मुलाखतीत स्पष्टीकरणही दिलं होतं. एका गाण्यामध्ये गाणं म्हणत असताना अचानक डोळ्यात अश्रू आणायचे होते. मात्र, काही केल्या ते अश्रू माझ्या डोळ्यात येत नव्हते त्यामुळे कदाचित मला कामात रस नाही असा समज दिग्दर्शकांचा झाला असावा, असं सैफ म्हणाला होता.