57 वर्षांनी समोर आला दिलीपकुमार-सायरा बानोच्या लग्नाचा video; लग्नातील थाटा पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 08:00 AM2023-10-13T08:00:00+5:302023-10-13T08:00:00+5:30
Saira banu: सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात २२ वर्षांचं अंतर होतं. मात्र, तरीही त्यांनी नेटाने संसार केला.
बॉलिवूडच्या इतिहासात प्रचंड गाजलेली जोडी म्हणजे सायरा बानो आणि दिलीप कुमार. वयाने २२ वर्ष मोठ्या असलेल्या दिलीप कुमार यांच्या सोबत सायरा बानो यांनी लग्नगाठ बांधली त्यावेळी त्यांना अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मात्र, लोकांचा राग, ट्रोलिंग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत संसार केला. इतकंच नाही तर दिलीप कुमार यांच्या अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी त्यांची साथ दिली. त्यामुळे या जोडीच्या प्रेमाचं उदाहरण आजही दिलं जातं. दिलीप कुमार यांचं निधन होऊन आता बराच काळ लोटला आहे. मात्र, सायरा बानो आजही त्यांची प्रत्येक क्षणी आठवण काढतात. म्हणूनच, त्यांच्या आठवणीत त्यांनी त्यांच्या लग्नातील दुर्मिळ व्हिडीओ पहिल्यांदाच चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
११ ऑक्टोबर १९६६ रोजी सायरा बानो आणि दिलीप कुमार यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाला नुकतीच ५७ वर्ष पूर्ण झाली. या निमित्ताने तब्बल ५७ वर्षानंतर सायरा बानो यांनी त्यांच्या लग्नाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला. सोबतच दिलीप कुमार यांच्यासाठी एक स्पेशल नोटही लिहिली.
नेमकं काय म्हणाल्या सायरा बानो?
''आज, 11 ऑक्टोबर, आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे. माझे हितचिंतक आणि जवळचा असा मित्रपरिवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी खास ही पोस्ट लिहित आहे, ज्यांनी मला या सुंदर दिवसांच्या आठवणी पाठवल्या. दिलीप साहेब आणि मी.. अवकाशात तारे चमकत होते, लाखो लोकांसाठी वेळ जणू काही थांबली होती. दिलीपसाहेब यांच्या गैरहजेरीत मी दोन वर्ष त्यांचे अनेक किस्से शेअर करत घालवले आहेत. ते किस्से जे फक्त मलाच माहित आहेत. त्यांच्या या सगळ्या गोष्टी मला ५७ वर्षांपूर्वीच पत्नी म्हणून कळाल्या. त्यामुळे त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या प्रयत्नात तुम्ही सगळ्यांनी जी माझी मदत केली त्या सगळ्यासाठी आभार.
लोकांनी मला अनेकदा विचारलं... दिलीप कुमार साहेबांशी लग्न करणं कसं होतं... 'शहेनशाह' आणि मी त्या लोकांना नेहमी म्हणायचो की, "त्यासाठी गादी न लावता सिंहासन शेअर केल्यासारखे!". ही खरी सिंड्रेला कथा आहे! प्रत्येक मुलीला तिच्या स्वप्नातील राजकुमार मिळतोच असं नाही. माझं आयुष्य त्यांच्यासोबत कसं होतं हे सांगणं तसं फार कठीण आहे. हे सांगण्यासाठी माहित नाही किती पानं, मला तर वाटतंय एक पुस्तक लागेल. साहेब फक्त माझ्या आयुष्यात प्रकाश देणारे लाइट नव्हते. तर त्या सगळ्यांसाठी होते जे त्यांच्या आयुष्यात आले आणि त्यांच्यासोबत राहिले. ते खूप ग्रेट होते. ते असं एक पुस्तक होतं जे तुम्ही कधीच वाचणं बंद करु शकत नाहीत. कारण, दररोज तुम्ही त्यांच्या आयुष्याचं एक नवीन पान वाचता.
दरम्यान, या पोस्टमध्ये सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्याविषयी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्या वयात २२ वर्षांचं अंतर होतं. मात्र, तरीदेखील त्यांच्यातलं प्रेम कधीच कमी झालं नाही. २०२१ मध्ये दिलीप कुमार यांनी वयाच्या ९८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर सायरा बानो प्रचंड खचल्या आहेत. मात्र, त्या कायम त्यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा देत असतात.