सवत हेलन यांना स्वीकारताना सलमावर झाला होता 'हा' परिणाम; बऱ्याच वर्षाने अरबाजने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 02:32 PM2023-03-02T14:32:25+5:302023-03-02T14:35:51+5:30
Salma khan: सलीम खान आणि सलमा यांनी १९६४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर सलीम खान यांनी १९८१ मध्ये अभिनेत्री हेलनसोबत दुसरं लग्न केलं.
बॉलिवूड अभिनेता, निर्माता अरबाज खान (arbaaz khan) सध्याच्या त्याच्या 'द इन्विन्सिबल्स' या शोमुळे चर्चेत येत आहे. या शोमध्ये आतापर्यंत कलाविश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली आहे. या शोमध्ये कलाकार बऱ्याचदा त्यांच्या जीवनातील काही गोष्टींचा खुलासा करतात. त्यामुळे हा शो सध्या चांगलाच चर्चेत येत आहे. परंतु, यावेळी खुद्द अरबाजच्याच जीवनातील एका मोठ्या गोष्टीची चर्चा रंगली आहे. वडील सलीम खान यांनी दुसरं लग्न केल्यानंतर आपल्या आईची अवस्था कशी झाली होती हे त्याने सांगितलं आहे.
'इंडियन एक्स्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अरबाजने त्याच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नावर भाष्य केलं. सलीम खान यांनी हेलनसोबत लग्न केल्यानंतर आई सलमा यांना जबर धक्का बसला होता असं त्याने म्हटलं.
सलीम खान (salim khan) आणि सलमा (salma khan) यांनी १९६४ मध्ये लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर सलीम खान यांनी १९८१ मध्ये अभिनेत्री हेलनसोबत (helen) दुसरं लग्न केलं. या लग्नानंतर त्यांनी अर्पिताला दत्तकही घेतलं. परंतु, या लग्नाचा सलमा यांच्यावर चांगलाच परिणाम झाला होता. एकाच घरात सवतीसोबत राहणं सलमा यांना कठीण जात होतं.
"वडिलांचं दुसरं लग्न ही गोष्ट पचवणंच आमच्यासाठी कठीण होती आणि आईसाठी तर त्याहून जास्त कठीण. त्या काळात आम्ही सगळी भावंडं कळत्या वयात होतो. परंतु, या गोष्टीचा आमच्या मनावर कधीच कोणता परिणाम होणार नाही याची काळजी घेतली गेली", असं अरबाज म्हणाला.
दरम्यान, अलिकडेच अरबाजच्या 'द इन्विन्सिबल्स' मध्ये हेलन यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी सलीम खान सोबतच्या लग्नावर उघडपणे भाष्य केलं. "सलीम खान यांनी त्यांच्या चित्रपटात मला भूमिका दिली होती. त्यानंतर आमची मैत्री झाली. तो काळ तुझ्या आईसाठी खरंच खूप कठीण असेल. पण, मला वाटतं नियतीच्या मनात तेच होतं. तिनेच मला तुमच्या जवळ केलं. मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे आहेत. आणि, मला कधीच सलीम खान यांना त्यांच्या परिवारापासून वेगळं करायचं नव्हतं."