पुन्हा चढणार ‘मैनें प्यार किया’चा फिव्हर! पडद्यावर दिसणार प्रेम व सुमनची जोडी!!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2018 10:58 AM2018-07-31T10:58:11+5:302018-07-31T11:01:15+5:30
होय, या चित्रपटाद्वारे सलमान व भाग्यश्रीची जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर परतणार आहे.
1989 मध्ये आलेल्या ‘मैनें प्यार किया’ या चित्रपटातील प्रेम आणि सुमनची जोडी आठवते ना? या जोडीने प्रत्येक वयोगटातील सिनेप्रेमींच्या मनात जागा मिळवली. प्रेमच्या भूमिकेतील सलमान खान आणि सुमनची व्यक्तिरेखा रंगवणारी भाग्यश्री हे दोघेही प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनलेत. सलमानचा हा पहिला सोलो चित्रपट होता तर भाग्यश्रीने या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले होते. या चित्रपटाने अनेक पुरस्कारांवर नाव कोरले, बॉक्सआॅफिसवर अनेक विक्रम नोंदवले. अर्थात याऊपरही प्रेम व सुमनची जोडी पुन्हा कधीच एकत्र दिसली नाही. ‘मैनें प्यार किया’नंतर सलमानची गाडी सूसाट निघाली. याऊलट भाग्यश्रीचे यानंतरचे ‘कैद में बुलबुल’, ‘त्यागी’, ‘पायल’ सारखे चित्रपट दणकून आपटले. पुढे तिच्या करिअरला ओहोटी लागली. यापश्चात भाग्यश्रीने हिमालय दसानीसोबत संसार थाटला. आता भाग्यश्रीचा मुलगा चित्रपटांच्या दुनियेत एन्ट्री घेतोय. रॉनी स्क्रूवाला यांच्या ‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटातून तो डेब्यू करतो आहे. याच चित्रपटाच्या निमित्ताने एक खास खबर आम्ही तुम्हाला देणार आहोत.
होय, या चित्रपटाद्वारे सलमान व भाग्यश्रीची जोडी पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर परतणार आहे. ताज्या बातमीनुसार, अभिमन्यूच्या या चित्रपटात ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातील एक हिट गाणे दिसणार आहे. या गाण्याचे म्युझिक राईट्स असलेली कंपनी आणि ‘मैंने प्यार किया’च्या प्रॉडक्शन कंपनीने यासाठी होकार दिला आहे. आता केवळ हे गाणे जसेच्या तसे अभिमन्यूच्या चित्रपटात घ्यावे की नव्या पिढीला डोळ्यासमोर ठेवून नव्या गायकांकडून ते रिक्रिऐट केले जावे, यावर विचार सुरू आहे.
‘मर्द को दर्द नहीं होता’ या चित्रपटात अभिमन्यूच्या अपोझिट दिसणार आहे, ती राधिका मदन. अभिमन्यू व राधिका या दोघांनी ब-याच दिवसांपासून चित्रपटाची तयारी सुरु केल्याचे कळतेय. कारण या चित्रपटात जबरदस्त अॅक्शन सीन्स आहेत. भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करून चुकला आहे. ‘दम मारो दम’ आणि ‘नौटंकी साला’मध्ये त्याने अस्टिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. सध्या तरी तो आपल्या डेब्यू चित्रपटात व्यस्त आहे.